उर्दू शाळा हाळखुर्द पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत
| रसायनी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील हाळ खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दतील शंभर वर्षांहून अधिक काळ जुनी असलेली जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेची इमारत आता अखेरची घटका मोजत आहे. अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करताना देशात शैक्षणिक बाबतीत आजही निर्णय घेण्यासाठी प्रशासन विलंब करत आहे. याचे उदाहरण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात हाळ खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंदाजे 12 गुंठ्यांत असलेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या पडीक अवस्थेतील शाळेला पाहून समजते. इ. स 1905 साली बांधण्यात आलेली ही शाळा आजच्या जमिनीच्या जोत्यापासून कमकुवत कमजोर झाली आहे. छप्पर, भिंती, खिडकी अतिशय खराब झाल्याने कधीही हा भयानक अशी जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते. तालुक्यातील अल्पसंख्याक वसाहतीतील सुमारे 4000 लोकसंख्येपेक्षा जास्त दाट लोकवस्ती असलेल्या या गावात 118 वर्षे जुन्या असलेल्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्या 128 जणांच्या परिवारातील लहान लेकरांना जीव मुठीत धरून कधीपर्यंत पाठवायचं, अशी चिंता पालकांना सतावत असते.
सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच अझीम मांडलेकर यांच्या शिष्टमंडळाच्या पाठवपुराव्यामुळे 2020 पासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनाकडे शाळेच्या पुनर्बांधणीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. इतर विकासकामांना निधी देऊन अल्पसंख्याक समाजाच्या उर्दू शाळेसाठीचा निधी आजपर्यंत मिळत नसल्याने अनेक मुस्लिम बांधव नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. शाळेची अवस्था पाहता जनसहभाग व दानशूर उद्योजक नौफिल सय्यद यांच्या साह्याने आर्थिक मदत घेत शाळेची तात्पुरती दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात आली होती. अनेक वर्षे दुर्लक्षित करणाऱ्या खालापूर गटशिक्षणाधिकारी विभागाकडे याबाबत माहिती घेतली असता दुरुस्तीसाठी म्हणून साधारणता 15 लाख रुपये निधी देणार येणार असल्याचे समजले. ज्या उर्दू शाळेचा सिव्हिल स्ट्रक्चर पायाच मजबूत राहिला नाही, त्या शाळेत जमिनीतून पाणी वर येत असेल, अशा परिस्थिती औपचारिक दुरुस्ती करून भविष्यात होणाऱ्या जीवितहानीला आमंत्रण द्यायचे का? अभियंता व प्रशासकीय अधिकारी यांना विद्यार्थी म्हणून असलेल्या लहान मुले व शिक्षकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा अधिकार कोणी दिला, असा संतापजनक सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच अजीम मांडलेकर, सरपंच शबनम मुल्ला, सदस्य कासिम बेडेकर, कमली वाघमारे, असिफ बेडेकर, प्रभास क्षीरसागर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जाहिदा मुल्ला, ग्रामस्थ मंगेश क्षीरसागर, चंदर वाघमारे तसेच मुख्याध्यापक जलालुद्दीन सांगरे, शिक्षक कय्युम दाखवे, अहमद वाडेकर, शगुप्ता सय्यद, ग्रामसेवक स्वप्नाली बागल, पत्रकार आदी अल्पसंख्याक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक आमदार व जिल्हा प्रशासन यांच्या प्रयत्नाने लवकर तातडीने याबाबत निर्णय व्हावा अशी अपेक्षा ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्व करत आहोत.
अझीम मांडलेकर
पुनर्बांधणी न करता तात्पुरती दुरुस्ती केल्यास भविष्यातील होणाऱ्या जीवितहानीला प्रशासन जबाबदार राहील.
शबनम मुल्ला
अल्पसंख्यांक समाजाचा शैक्षणिक धोरणाबाबत दुर्लक्षित करणाऱ्या घटकांना समाज बांधव म्हणून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
मंगेश क्षीरसागर