अलिबागच्या सांस्कृतिक ओळखीला अधिक भव्य रूप देण्याचा निर्धार; २५ ऑगस्टपासून स्पर्धेचे अर्ज उपलब्ध
|अलिबाग |प्रतिनिधी|
मानाची दहीहंडी ही केवळ गोविंदांची स्पर्धा नसून अलिबागच्या सांस्कृतिक अस्मितेची ओळख जपणारा लोकउत्सव आहे. २४ वर्षांची ही गौरवशाली परंपरा आता Gen-Z पिढीशी जोडत परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवण्याचा संकल्प शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक आघाडी व प्रशांत नाईक मित्र मंडळाने केला आहे. यंदाची मानाची दहीहंडी अधिक भव्य, आकर्षक आणि युवककेंद्रित करण्यासाठी नियोजनाला सुरुवात झाली असून, अलिबागच्या सर्वात प्रतिष्ठेच्या दहीहंडीला नव्या उंचीवर नेण्यात येणार असल्याचे प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले.
रविवारी शेतकरी भवन, अलिबाग येथे झालेल्या नियोजन सभेत मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेच्या आयोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रदीप नाईक, नगरसेविका संध्या पालवणकर तसेच नगरसेवक अनिल चोपडा, सागर भगत, ऋषिकेश माळी, आनंद पाटील यांच्यासह मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या स्पर्धेत यंदा पारंपरिक गोविंदा थरांसोबतच युवकांच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या Reel Star स्पर्धेचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक उत्सवाला आधुनिक अभिव्यक्तीची जोड मिळणार आहे.
पुरुष गोविंदा पथकासाठी २,५१,००० व मानाचा चषक, तर महिला गोविंदा पथकासाठी १,०१,००० व मानाचा चषक अशी प्रथम पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. तसेच Reel Star स्पर्धेत प्रथम ११,०००, द्वितीय ₹७,००० आणि तृतीय ५,००० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अलिबागच्या सांस्कृतिक अस्मितेशी जोडलेली मानाची दहीहंडी यंदाही परंपरा, प्रतिष्ठा आणि विजयाचा जल्लोष अधिक दिमाखात साजरा करणार असल्याचा विश्वास प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.
२५ ऑगस्टपासून नोंदणी
स्पर्धेचे अर्ज २५ ऑगस्ट २०२६ पासून शेतकरी भवन, अलिबाग येथे उपलब्ध होणार असून राज्यभरातील गोविंदा पथके आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.





