| नेरळ | प्रतिनिधी |
मावळ लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात असून मावळमध्ये शिवसेनेच्या दोन गटामध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. मात्र प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटीका रेखा ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. दरम्यान, रायगड जिल्ह्यात महिला आघाडी वाढविण्यात आणि पक्ष संघटना बळकट करण्यात मोठा वाटा असल्याने रेखा ठाकरे यांच्या प्रवेशाने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार असताना आणि झुणका भाकर केंद्र युती काळात सुरू करून शिवसेनेच्या प्रवाहात रेखा ठाकरे सक्रिय झाल्या. साडेतीन वर्षे मुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यावेळी कर्जत झुणका भाकर केंद्राचे कौतुक केले होते. नंतर कर्जत तालुक्यात कार्यरत असलेल्या रेखा ठाकरे यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीची रायगड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर महिला संघटन मजबूत करण्यात आणि रायगड जिल्ह्यात संघटन पाहून शिस्वेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील रायगडच्या शिवसेना महिला आघाडीचे जिल्हा संघटिका रेखा ठाकरे यांचे कौतुक केले होते.
राज्यातील मजबूत असे संघटन म्हणून रायगड जिल्ह्याचे नाव होते आणि त्यात स्वतः आघाडीवर राहून जिल्हाभर पक्ष संघटना मजबूत करण्याचे कार्य रेखा ठाकरे यांच्याकडून झाले होते. राज्यात शिवसेना फुटीनंतर रेखा ठाकरे या शिवसेना शिंदे गटात राहिल्या होत्या. मात्र, कर्जत चार फाटा येथील दुकाने वाचविण्यासाठी आमदारांनी सहकार्य केले नसल्याने रेखा ठाकरे या पक्षावर नाराज होत्या. पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्जत येथे विकासकामांचे लोकार्पण सोहळ्यात महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
शिवसेनेवर नाराज असलेल्या रेखा ठाकरे यांनी 9 मे रोजी युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. रेखा ठाकरे यांचा रायगड जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क यामुळे त्यांच्या ठाकरे गटाच्या प्रवेशाने काही राजकीय फायदा मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना होण्याची शक्यता आहे.