जमिनीमधील कर्ब वाढवण्यासाठी यशस्वी प्रयत्न; उत्पादन खर्चात बचत करण्यास मदत
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कृषी पदवीधर शेतकरी हेमंत कोंडिलकर यांनी शेतकऱ्यांना वरदान ठरेल असे कल्चर विकसित केले आहे. हे कल्चर शेतकऱ्यांच्या शेत जमिनीमधील कर्ब वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे. त्याचा वापर करून आपली आर्थिक स्थिती सुधारून शेती मधील उत्पादन खर्चात बचत करण्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होऊ शकते.
सध्या खताच्या वाढलेल्या किंमती, बियाण्यांमधील भेसळ आणि प्रामुख्याने मजुरांची भेडसावणारी समस्या, तसेच मजुरीचे वाढते दर ही भीषण समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. त्याशिवाय ग्लोबल वॉर्मिगमुळे निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस संकटात सापडत आहे. तसेच, रासायनिक खते व किटकनाशकांच्या अधिक वापर केल्याने शेत जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील कमी झाले आहे. यावर कर्जत तालुक्यातील बार्डी गावातील कृषी पदवीधर तरुण हेमंत कोंडिलकर यांनी गेल्या सहा वर्षांपासुन शेतीमध्ये अनेक विविध प्रकारचे यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यात त्यांनी आपल्या शेतातील मोकळ्या जागेत कमीत कमी खर्चात तयार होणारी जैविक शेतीसाठी लागणारे मदर कल्चर तयार करण्याचा प्रकल्प साकारला आहे. या मदर कल्चरमुळे शेतपिकाचे उत्पादन खर्चामध्ये बचत होते. तसेच, सध्या बाजारातील खताच्या वाढलेल्या किमतीचा कोणताही परिणाम होत नाही.
हे नवीन तंत्र डॉ. के. चंद्रा यांनी प्रगत केले होते. तसेच, त्यातून शेतकऱ्याला आपल्या शेतीसाठी लागणारी सर्व जैविक खते घरच्या घरी कशी बनवता येतील, असा निष्कर्ष काढला होता. त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संशोधन केले. आज डॉ. के. चंद्रा हे हयात नाहीत. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना सुचवलेले मदर कल्चरचे तंत्र शेतकऱ्यांना मदतगार व्हावे यासाठी पदवीधर तरुण कोंडिलकर यांनी पुन्हा विकसित केले आहे. त्यामुळे शेत जमिनीमधील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदर कल्चर चांगले मदतगार ठरू शकते, असा विश्वास हेमंत कोंडिलकर यांना आहे. तसेच, मागील काही वर्षे कृषी पदवीधर हेमंत कोंडिलकर यांनी जनावरांना होणाऱ्या लॅम्पी आजारावरील तयार केलेले फूड ग्रेड औषध शेतकऱ्यांना मदतगार ठरत आहे. या फूड ग्रेडचे चांगले अनुभव आजुबाजूच्या तालुक्यातील शेतकरी मिळवत आहेत.







