तीन लाख 900 रुपयांचा दंड वसूल
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
किराणा दुकानांपासून पान टपरीवर विमल गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ खुलेआमपणे विक्री केली जाते. त्याच्या आहारी तरुणाई जाण्याची भिती वाढली आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अडीच वर्षात सुमारे दीड हजार जणांविरोधात कारवाई करीत त्यांच्याकडून तीन लाख 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तंबाखू सेवन करणार्यांना या कारवाईतून दणका देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, रोहा, पनवेल, उरण अशा अनेक भागांमध्ये विमल, गुटखा, आरएमडी सारख्या तंबाखूजन्य पदार्थांचे गोडावून जिल्ह्यात खुलआमपणे चालु आहेत. टेम्पो, कार, दुचाकीच्या मदतीने त्यांची वाहतूक रात्री, पहाटेच्या सुमारास केली जाते. सकाळपर्यंत किराणा दुकान, पान टपरीवर हे तंबाखूजन्य पदार्थ पोहचले जात आहे. गुटखा, गोवा, विमल सारखे तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचा फॅड प्रचंड वाढला आहे. 20 वर्षापासून 45 वयोगटातील अनेक मंडळी एक आवड म्हणून हे तंबाखूजन्य पदार्थ खातात.या तंबाखू जन्य पदार्थांची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात केली जाते. काही विक्रेते कागदी पुडी तयार करून, गुटखा, गोवा आदी तंबाखूजन्य पदार्थ मागणीनुसार ग्राहकांना देतात. हे तंबाखूजन्य पदार्थ खाणार्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्याचा शरीरावर ही त्रा होण्याची चिंता वैद्यकिय विभागाने व्यक्त केली आहे.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर नियंत्रण व बंदी ठेवण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष नेमण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली हे कक्ष काम करीत आहे. या कक्षामार्फत आतापर्यंत दीड हजार जणांचे समुपदेशन करून त्यांना तंबाखू सोडण्यास भाग पाडले आहे. कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. तसेच तंबाखू विक्री करण्यापासून तंबाखू सेवन करणार्यांवरही कारवाईची मोहीम या विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. अडीच वर्षात तीन लाख रुपयांचा दंड कारवाईतून वसूल करण्यात आला असल्याची माहिती तंबाखु नियंत्र कक्षाकडून देण्यात आली आहे.
अशी केली कारवाई
एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत एक हजार 16जणांवर कारवाई करून दोन लाख 22 हजार रुपयांचा दंड वसूल केला. एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 31 जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून 68 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत 53 जणांविरोधात कारवाई करून दहा हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.