। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील गोरेगाव परिसरात भरधाव कारने दुचाकीस्वारावर धडक दिली. या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, घटनेतील कारचालक हा अल्पवयीन आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 29) पहाटे नवीन वैष्णव (24) हा दूध डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकी घेऊन बाहेर पडला होता. त्याचवेळी आरे कॉलनीतून जात असताना समोरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली आणि तो जोरात आदळला. या अपघात नवीन वैष्णव हा गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्या जखमी तरूणाला उपचारांसाठी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना अटक केली असून अपघातग्रस्त कारही ताब्यात घेतली आहे.