वरंडोली येथे कार शेतकऱ्याच्या घरात घुसली

। महाड । प्रतिनिधी ।

महाड येथील वरंडोली येथे कार चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रस्त्यालगत असलेल्या घरामध्ये घुसली. या भीषण अपघातात घराचे प्रचंड नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड वरून झायलो कार प्रचंड वेगाने येत होती. वरंडोली गावच्या हद्दीत आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट सचिन दळवी यांच्या घरावर जाऊन आदळली. कारची धडक इतकी जोरदार होती की घराची भिंत, अंगणातील मंडप, दरवाजा आणि घरातील साहित्याचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताच्यावेळी दळवी कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते. मोठा आवाज ऐकताच त्यांनी प्रसंगावधान राखले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. कार चालकाला किरकोळ दुखापत झाली असली तरी, त्याने मद्यप्राशन केले होते, असा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version