पंतप्रधान मोदी, अदानींविरोधात अमेरिकेत खटला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी आणि ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार, पेगासस, स्पायवेअरचा वापर आणि इतर मुद्द्यांवर हा खटला दाखल करण्यात आला असून अमेरिकेतील कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने या सर्वांविरुद्ध समन्स जारी केले आहेत. या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममचे अध्यक्ष आणि संस्थापक प्रोफेसर क्लॉस श्‍वाब यांच्या नावाचाही समावेश आहे.

भारतीय वंशाच्या अमेरिकन डॉ.लोकेश वुरुरू यांनी हा खटला दाखल केला आहे. मूळचे आंध्रप्रदेशातील या डॉक्टरने पंतप्रधान मोदी, रेड्डी, अदानी आणि इतर भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला आहे. ज्यात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात रोख हस्तांतरण आणि राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस वापरण्याचा समावेश आहे. मात्र, संबंधित डॉक्टरने याबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नाही.

वुरुरू यांनी 24 मे रोजी खटला दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने 22 जुलै रोजी समन्स जारी केले असून, ते 4 ऑगस्ट रोजी प्राप्त झाले आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमधील भारतीय-अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी हा खटला पूर्णपणे निरर्थक असल्याचे म्हणत यातून काहीही मिळणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

Exit mobile version