सत्तेतून गेलेल्या पंतप्रधान वा अध्यक्षाविरुध्द गुन्हेगारी खटले भरणे वा त्याला तुरुंगात टाकणे हे तिसर्या जगातील देशांमध्ये सर्रास होते. भारत आणि आसपासच्या देशातीलच उदाहरणे पाहायची तर इंदिरा गांधी, बेगम खलिदा झिया, नेपाळचे प्रचंड अशी अनेक नावे आठवता येतील. पाकिस्तानात तर एकही सत्तांतर सरळपणे झालेले नाही. झुल्फिकार अली भुत्तोंविरुध्द बंड करणार्या झियांनी त्यांना फासावर चढवले. बेनझीर भुत्तोविरुध्द खटले भरण्यात आले आणि त्यांची हत्या झाली. नवाझ शरीफ, परवेझ मुशर्रफ यांना देश सोडून पळून जावे लागले. इम्रान खानला अटक करण्यावरून मोठा तमाशा चालू आहे. भारतात नरेंद्र मोदी आल्यापासून आपला देश त्याच मार्गाने जाऊ लागलेला आहे. आता हेच लोण अमेरिकेतही पोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी एका जुन्या खटल्यात तांत्रिक अटक करण्यात आली. माजी राष्ट्राध्यक्षावर खटला होऊन अटक होण्याची अमेरिकी इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. ट्रम्प हे बायकांच्या भानगडींसाठी कुविख्यात आहेत. 2016 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्यावर त्याच्या प्रचारात अडचण नको म्हणून त्यांनी अशाच एका लफड्यावर पांघरूण घालण्यासाठी संबंधित महिलेला लाखो डॉलर देऊ केले होते. अमेरिकी कायद्यानुसार हा गुन्हा आहे. त्याचखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. अर्थात ही कागदावरची अटक इथून पुढे त्यांच्यावर खटला चालेल. एकीकडे हे चालू असताना ट्रम्प हे 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी पुन्हा उभे राहण्याची तयारी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी 40 लाख डॉलर्स जमा केले आहेत. ट्रम्प यांना निवडणूक लढवता येऊ नये यासाठीच हा खटला उभा करण्यात आल्याचं अनेकांचं मत आहे. मात्र असे केल्याने ट्रम्प यांची लोकप्रियता उलट वाढलीच आहे अशाही बातम्या आहेत. भारतात आपल्याला याचे आश्चर्य वाटणार नाही. आणीबाणीच्या विरोधात जनतेने राग प्रकट केला. पण चरणसिंगांनी जेव्हा इंदिरा गांधींना तुरुंगात पाठवण्याचा चंग बांधला तेव्हा मात्र जनतेने बाईंना पाठिंबा दिला होता. ट्रम्प यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करावेत अशी खरे तर इतर अनेक गंभीर प्रकरणे आहेत. सर्वात मोठे कांड म्हणजे 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी सर्व जगाने पाहिले. त्यावेळी ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केला नाही आणि निवडणूक यंत्रणेबाबतच साशंकता व्यक्त केली. त्यातूनच नंतर ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊसवर हल्ला केला. एरवी आफ्रिकी वा आशियाई देशांमध्ये असे प्रकार घडत असतात. पण अमेरिकेत तो घडल्याने जगाला धक्का बसला. नंतर हाच कित्ता ब्राझीलमध्ये बोल्सनारो यांच्या समर्थकांनी गिरवला. मोदी-भक्तांचा उन्माद पाहता उद्या भारतातही असाच प्रकार घडला तर आश्चर्य वाटू नये. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर त्या प्रकरणात जरब बसेल अशी कारवाई होण्याची गरज आहे.