| पनवेल | वार्ताहर |
शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे आणि त्या पैशांवर मिळणाऱ्या कमिशनची रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी सात अनोळखी इसमांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील डांगे हे सेवानिवृत्त असून, ते तळोजा फेज वन येथे राहतात. मार्च महिन्यात त्यांना विनिता पटोडिया या अनोळखी महिलेचा मेसेज आला आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर फायदा होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर या महिलेने तिच्या सहा साथीदारांच्या मदतीने सुनील डांगे यांना ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. इतर लोकांनी पैसे गुंतवल्यावर त्यांना कसा फायदा होतो, हे त्यांना समजावण्यात आले. त्यानंतर डांगे यांनी कमी किमतीचे शेअर्स विकत घेतले. यावेळी त्यांना फायदा झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते गुंतवत असलेल्या पैशावर जास्त फायदा होत असल्याचे त्यांना दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांनी या टोळीने सांगितलेल्या विविध खात्यांवर पैसे पाठवून आणखी काही शेअर्स घेतले. अशा प्रकारे त्यांनी एकूण 10 लाख 91 हजार रुपयांची गुंतवणूक या शेअर्समध्ये केली. त्यानंतर त्यांनी गुंतवलेली रक्कम कमिशनसह देण्याबाबत विचारणा केली असता या टोळीने त्यांना आणखी पैसे गुंतवण्यास सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यावर या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणात सात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.