। ठाणे । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग ते ठाणे स्थानकांच्या दरम्यान दिव्यांगांच्या डब्यात एका दृष्टीहीन महिलेवर मुस्लिम कुटुंबाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून मुस्लिम कुटुंबाबरोबर एका दृष्टीहीन महिलेचा वाद झाला. त्यानंतर मुस्लिम कुटुंबाने या महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी कल्याण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून टिटवाळ्याच्या दिशेने निघालेली लोकल रात्री 9.12 वाजता कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात आली. या ठिकाणी दृष्टीहीन महिला सोनू गाडेकर (33) या नेहमीप्रमाणे दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढल्या. त्याचवेळी बसण्याच्या जागेवरून त्यांचा एका मुस्लिम कुटुंबाबरोबर वाद झाला. या वादातून मुस्लिम कुटुंबाने या महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर हे कुटुंब मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरले. एका प्रवाशाने या मारहाणीचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून तो सोशल मीडियावर टाकला आहे. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासून कल्याण पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.