। दापोली । प्रतिनिधी ।
दापोली तालुक्यात अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली आहे. अशातच वाकवली गावामध्ये एक दुर्घटना घडली आहे. वीज कोसळून गुरांचा गोठा जळून खाक झाला. सुदैवाने, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, गुरे जखमी झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 20) दुपारी अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने दापोली परिसरात हजेरी लावली. यादरम्यान, वाकवली येथील शरद जंगम यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज कोसळली. त्यामुळे गोठ्याला लागली आणि काही क्षणातच गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने वीज कोसळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन गोठ्यातील गुरांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमध्ये शरद जंगम यांचे मोठे नुकसान झाले असून गुरे जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच गावच्या ग्रामस्थांसह तलाठी, पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.