| अहमदनगर | प्रतिनिधी |
मुळा धरणाच्या पाण्यात मित्रांच्या समवेत पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज मंगळवारी (दि.21) सकाळी सहा वाजता धरणातील मत्स्योद्योग (केज) परिसरात मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. भगवान रुस्तुम घाडगे (35), रा. नागापूर, अहिल्यानगर असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, अहिल्यानगर औद्योगिक वसाहत परिसरातील सात-आठ मित्रांच्या समवेत रविवारी (दि.18) मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. धरणातील पाणी पाहिल्यावर त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. सर्वजण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. यावेळी भगवान घाडगे यांची पाण्यात पोहताना दमछाक झाली. ते पाण्यात बुडाले. त्यांच्या समवेत पोहणाऱ्या तरुणांनी आरडाओरड केला. मदतीसाठी धावले. तोपर्यंत घाडगे पाण्यात गायब झाले होते. मित्रांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, ते सापडले नाहीत. त्यांचा मृतदेह आज सकाळी सहा वाजता धरणातील केज प्रकल्पाच्या जवळ पाण्यावर तरंगताना आढळला. राहुरी येथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.