। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे. त्यातच पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री परिसरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याखालची माती खचली. यामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेग पडल्याचे दिसून आले आहे. परिणामी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
हरिश्चंद्री येथे सध्या ओव्हरब्रिजचे काम सुरू असल्यामुळे तीनपैकी दोन लेन बंद होत्या. त्यामुळे वाहतूक फक्त एकाच लेनवरून सुरू होती. त्यातच या एकमेव उघड्या लेनवर रस्ता खचून मोठी भेग पडल्यामुळे वाहतुकीस आणखी अडथळा निर्माण झाला. गेल्या 3-4 दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे, रस्त्याखालील माती खचली आणि त्यामुळे मुख्य रस्त्याला मधोमध खोल भेग पडली. ही स्थिती अत्यंत धोकादायक होती. प्रशासनाने तत्काळ सिमेंटच्या साहाय्याने ही भेग भरून काढली. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी फक्त एकाच लेनवरून वाहतूक सुरू ठेवावी लागली. त्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांची गर्दी झाली. महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली. या घटनेमुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महामार्गावरील दर्जा आणि बांधकाम कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने जरी तातडीने दुरुस्ती केली असली तरी ओव्हरब्रिजच्या कामामुळे उर्वरित रस्ताही धोकादायक स्थितीत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि वेळेत देखभाल होणे आवश्यक आहे.