अधिष्ठातांच्या आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन मागे
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करा, रोजगार द्या, शेतावर जाण्याचा मार्ग मोकळा करा, भरावामुळे होणारे भातशेतीचे नुकसान टाळण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी उसर येथील ग्रामस्थ व महिलांनी प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेच्या ठिकाणी लढा पुकारला. अखेर पोलीस व तहसीलदारांनी मध्यस्थी करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी लढा मागे घेतला. यावेळी गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव, खानावचे उपसरपंच निलेश गायकर, नारायण शिंदे, संदेश शिंदे, जयवंत वाडेकर, रामदास शिंदे, किसन घरत, तुकाराम शिंदे, जयेश शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
उसर येथील 53 एकर गुरचरण जागेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाणार आहे. या जागेवर प्रशासकीय इमारत आणि 500 खाटांचे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. महाविद्यालयाची इमारत बांधण्यात येणाऱ्या जागेच्या बाजूने गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा मार्ग आहे. हा मार्गच बंद करण्यात आला आहे. परंपरागत वहिवाटीचा रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. त्या वहिवाटीच्या जागेत कुंपण घालण्याचे काम केले जात आहे. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत भराव टाकून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये भातशेतीत पाणी जाऊन पिकती जमीन नापिक होणार आहे.
ही बाब उसर येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा पत्र देऊन प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तरीदेखील कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व महिलांनी एकत्र येऊन प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन सुरु केले. खानावचे उपसरपंच निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र आले. प्रकल्पाला विरोध नाही; परंतु उसर गावातील ग्रामस्थांना कायम व कंत्राटी पद्धतीने अग्रक्रमाने रोजगाराची संधी देण्यात यावी, नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत पूर्ववत सुरू करण्यात यावे, शेतीकडे जाणारा रस्ता पूर्ववत सुरु करण्यात यावा, मातीचा भराव काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी जोर धरत होती. अखेर अलिबागचे तहसीलादर विक्रम पाटील, मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस आणि तहसीलदार यांनी मध्यस्थी करीत डॉ. पूर्वा पाटील यांच्यासोबत बैठक घेण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली.
अलिबागमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयातील सभागृहात अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. उसर येथील ग्रामस्थ मंडळ शिष्टमंडळ, पोलीस, महसूल अधिकारी तसेच प्रकल्प उभारणीचे काम करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी अधिष्ठाता पूर्वा पाटील यांनी सांगितले की, वरिष्ठ पातळीवर चर्चा करून स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाईल. नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत पूर्ववत सुरू केला जाईल, वहिवाटीचा मार्ग पूर्ववत करण्यासाठी पर्यायी जागा देण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन पूर्वा पाटील यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी लढा तूर्तास मागे घेतला.
नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत पूर्ववत करा, स्थानिकांना विशेष करून उसर येथील ग्रामस्थांना अग्रक्रमाने रोजगार देण्यात यावा, शेतीकडे जाणारा पूर्ववत रस्ता देण्यात यावा, वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन नोकरी व जागेच्या प्रश्नाची चर्चा करण्यात यावी, याबाबत मागणी केली आहे. डॉ. पूर्वा पाटील यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे सध्या आंदोलन मागे घेतले आहे.
निलेश गायकर,
उपसरपंच