सोशल मिडियावर आमदारांची खिल्ली, बांधकाम विभागाची पोलखोल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे पुन्हा एकदा साम्राज्य दिसू लागले आहे. बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वीच रस्त्यांवरील खड्डे बुजवल्याचा दावा केला होता. मात्र, पुन्हा पावसाने दणका दिल्याने बांधकाम विभागाच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. तर स्थानिक आमदार यांच्या आश्वासनांची सोशल मिडियावर खिल्ली उडवली जात आहे. अलिबाग-रेवदंडा मार्गावर आरसीएफ कॉलनीजवळ पावसाला सुरुवात झाल्यापासूनच मोठमोठे खड्डे पडले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी लावून नागरिकांना चुना लावला. अखेर नागरिकांनी कंटाळून त्या खड्ड्यांमध्ये खुर्ची ठेऊन बांधकाम विभागासह स्थानिक आमदारांचीही खिल्ली उडवली आहे.
पावसाने गेल्या चार दिवसांपासून अलिबागमध्ये पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यातून मार्ग काढत नोकरीच्या ठिकाणी पोहचताना नागरिकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाने करोडो रुपये खर्च केले आहेत. परंतु, पावसाचे आगमन होताच पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत. यातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने रस्त्याच्या मधेच बंद पडत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असून वाहतूक कोंडी देखील सहन करावी लागत आहे.
याबाबत नागरिकांनी प्रशासनासह आमदारांकडेही रस्त्यांचे गऱ्हाणे मांडले होते. त्यावर आमदारांनी पाऊस असेल तर प्लास्टिक टाकून तात्काळ रस्ते दुरुस्ती करावी, असे हास्यास्पद उत्तर देऊन नागरिकांची दिशाभूल केली. अखेर कंटाळलेल्या नागरिकांनी रस्त्त्यात खुर्ची टाकून चिखलात लोळणाऱ्या आमदारांची चांगलीच टेर खेचली आहे. सुरुवातीला कृषीवलने आवाज उठविताच पहिल्या पावसांतच हा रस्ता करण्यात आला होता. मात्र, लगेच त्या रस्त्यावर खड्डे पडले. केवळ जाहिरात करण्यात प्रशासन खर्च करत आहे. माणसांच्या जीवाचे यांना पडलेले नाही. दोन हाणा पण स्मार्ट सिटी म्हणा, अशी गत तालुक्याची झाली आहे. अनेक ठिकाणी कागदोपत्री रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडणारच, अशी चर्चा परिसरात सुरु आहे.
