। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जागतिक शौचालय दिन 19 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधून स्वछतेत सातत्य राहण्यासाठी व गावांचा हागणदारीमुक्तीचा दर्जा टिकविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गट विकास अधिकार्यांना दिल्या आहेत.
जागतिक शौचालय दिनाच्या अनुषंगाने तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन करून वैयक्तिक शौचालय बांधकाम अनुदान मागणीसाठी ऑनलाइन प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे, प्रलंबित वैयक्तिक शौचालय पूर्ण करून प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करणे, एक खड्डा शौचालयाचे दोन खड्ड्यात रूपांतर करणे, विविध स्वयंसेवी संस्था व शासकीय विभागांच्या सक्रीय सहभागासाठी 19 नोव्हेंबर 2022 पर्यंत ग्रामपंचायतींना भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या अभियान अंतर्गत सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व शौचालयातील मैला गाळ व्यवस्थापन योग्य प्रकारे होण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मैला गाळ व्यवस्थापन सुविधेसाठी शहराच्या दहा किलोमीटर परिसरातील गावांना या सुविधेकरिता जोडण्यासाठी नियोजन करणे, गोबरधन प्रकल्प, शोषखड्डा बांधकाम, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांना बायोडायजेस्टर सिस्टीम बसविणे, घंटागाडीची सुविधा आदि उपक्रम राबवून जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे. गाव स्तरावर स्वच्छतेचे विविध उद्दिष्ट पुर्ततेकरिता सूक्ष्म नियोजन करून कामे पूर्ण केली जाणार आहेत.
याबाबत सर्व अधिकारी व कर्मचार्यांना नियोजन पूर्ण करून स्वच्छतेची मोहीम यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.