गोवे येथील तरूण गंभीर जखमी
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा मार्गावरील गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघाताची घटना घडली आहे. कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी अतिवेगाने मोटार सायकल चालवून गोवे येथील तरूणाला धडक देऊन गंभीर जखमी केले. या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील गोवे येथील गिता द. तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेज असुन येथे असंख्य विद्यार्थी मोटार सायकलवरून ये-जा करीत असतात. या रस्त्याला वेडीवाकडी वळणे असुन कॉलेजचे विद्यार्थी अतिवेगाने दुचाकी चालवत असतात. या मार्गावर स्थानिकांसह, विद्यार्थी व कामगारांची वदर्ळ असते.परंतु, अतिवेगाने जाणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांमुळे येथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत सातत्याने अतिवेगाने दुचाकीवरून जाणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांचा बंदोबस्त करावा, याची तक्रार गावातील ग्रामस्थ व तरुणांनी कॉलेजकडे केली आहे. याचदरम्यान गोवे रस्त्यावर शुक्रवार (दि.21) तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेज कडून मोटार सायकल वरून अतिवेगान जाणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनिल दहिंबेकर या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत अनिल दहिंबेकर गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी माणगांव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.







