। तळा । प्रतिनिधी ।
तळा तालुका कृषी विभागाच्यावतीने मेढा येथे शेतकर्यांना सामुदायिक बीज उगवण क्षमता चाचणीचे प्रात्याक्षिकद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी शुभम बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण पारंपरिक पद्धतीने भातपिक घेतो आणि एकदा घेतलेले पीक पुढील तीन ते चार वर्षे बियाणे म्हणून आपण त्याचा वापर करतो. परंतु, आपण घरगुती वापरत असलेले बियाणे विकत आणलेल्या बियाणांच्या दर्जाचे आहे का किंवा त्या दर्जाचे नसेल तर आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील, यासाठी बियाणांची उगवण क्षमता चाचणी महत्वाची ठरते. या चाचणीच्या माध्यमातून आपल्याला समजते की, आपल्याकडे असलेले बियाणे हे लागवडी योग्य आहे की नाही. आणि नसेल तर आपण आपल्यासाठी बियाणे कृषी सेवा केंद्र किंवा ईतर शेतकर्यांकडून विकत घेऊन आपले होणारे नुकसान या चाचणीच्या माध्यमातून आपल्याला टाळता येते. त्याबाबत प्रात्यक्षिक द्वारे सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी कृषी कर्मचारी व तालुक्यातील जवळपास 31 शेतकरी बांधव उपस्थित होते.