धाकट्या पंढरीत मंदिर देवस्थान कमिटीचा वाद पेटला

| खोपोली | प्रतिनिधी |

श्री विठोबा देवस्थान ताकई (साजगाव) येथील विठ्ठल मंदिराच्या देवस्थान कमिटीचा वाद विकोपाला गेला आहे. एकाच वेळी 2 अध्यक्ष कार्यरत असल्याने मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी राजकारण तापले आहे. साजगावची यात्रा काही दिवसांवर असतानाच देवस्थान कमिटीचा वाद पेटल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. धर्मादाय आयुक्तांनी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा सोपविलेल्या सुधीर पाटील यांनी लवकरच सगळे चित्र स्पष्ट होईल असा विश्‍वास व्यक्त केला आहे. तर गेली काही दिवसांपासून संघर्ष सुरू असतानाच दोन्ही गटाच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने संभ्रम कायम आहे. धर्मादाय आयुक्तांनी सुधीर पाटील यांच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांच्या हातात मंदिराचा कारभार सोपवण्यात यावा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया स्थानिकांकडून दिल्या जात आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साजगाव येथील विठ्ठल मंदिराची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात धाकटी पंढरी अशी आहे. कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेत राज्यभरातून हजारो भाविक येतात. 4 दिवसांवर यात्रा आली असून कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच यात्रा होत असल्याने सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. दरम्यान देवस्थान कमिटीचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अलिबाग येथील जिल्हा धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात न्यायालयीन लढाई सुरू आहे. धर्मादाय आयुक्तांनी अनंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली कमिटी बरखास्त करून 2016 मध्ये अस्तित्वात असलेली सुधीर पाटील यांच्या अध्यक्षते खालील कमिटी कायम करण्याचे आदेश दिले आहेत.

धर्मादाय आयुक्तांनी लेखी आदेश दिल्यानंतरही अनंत पाटील आणि त्यांचे सहकारी मंदिरावरचा आपला हक्क सोडायला तयार नाहीत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या साजगाव येथील विठ्ठल मंदिराच्या देवस्थान कमिटीचा वाद विकोपाला गेलाय. एकाच वेळी 2 अध्यक्ष कार्यरत असल्याने मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी राजकारण तापले असतानाच शुक्रवारी 28 ऑक्टोंबरला अध्यक्ष सुधीर पाटील यांनी पदभार घेण्यासाठी आले असता दोन्हीही गटात थोडा तू तू – मै होत दोघांनीही आपली बाजू मांडली. यावेळी किशोर पाटील, अतुल पाटील, रामदास पाटील, अनंत पाटील, डॉ. हेमंत पाटील, आर. एस. पाटील, नरेंद्र शहा, प्रकाश शहाणे, तानाजी पाटील, काशीनाथ पाटील, संदेश पाटील, दिनेश पाटील, मंगेश पाटील, युगल पाटील, सनी पाटील, विवेक पाटील, संकेत पाटील यांच्यासह ताकई ग्रामस्थ उपस्थित होते.

साजगावची यात्रा काही दिवसांवर असतानाच देवस्थान कमिटीचा वाद पेटल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा सोपवलेल्या सुधीर पाटील यांनी लवकरच सगळे चित्र स्पष्ट होईल आणि यात्राही सुरळीत पार पडेल, असा विश्‍वास व्यक्त करीत अ‍ॅड. किरण कोलसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी अ‍ॅड. प्रदीप तांडेल यांनी धर्मादाय आयुक्तांकडे योग्य बाजू मांडल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

Exit mobile version