अध्यक्षांची तहसील कार्यालयात बैठक
। खोपोली । प्रतिनिधी ।
श्री विठोबा देवस्थान ताकई धाकटी पंढरीचा अध्यक्ष कोण हा वाद वर्षभारापासून न्यायप्रविष्ट असतानाच दोन्हीही पक्षकारांची सखोल चौकशी केल्यावर सुधीर पाटील हेच अध्यक्ष असल्याचा निकाल धर्मादाय आयुक्तांनी दिला. मात्र विरोधकांनी निकाल मान्य केला नाही. तसेच विरोधक कार्यालयाचा ताबा देत नसून यात्रेतील व्यापार्यांना जागा देण्यासाठी दबावतंत्राचा वापर करीत असल्याने तहसीलदार आयुब तांबोळी यांनी बैठक बोलावून अध्यक्ष सुधीर पाटील आणि कमिटीशी चर्चा केली. तसेच यात्रा उत्सवात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार याची काळजी घेण्याची सूचना दिली.
संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साजगाव येथील विठ्ठल मंदिराची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात धाकटी पंढरी अशी आहे. कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. 15 दिवस चालणार्या या यात्रेत राज्यभरातून हजारो भाविक येतात. दोन दिवसांवर यात्रा आली असून कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच यात्रा होत असल्याने सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, देवस्थान कमिटीचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अलिबाग येथील जिल्हा धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात न्यायालयीन लढाई सुरू होती. अॅड. किरण कोलसमकर, असिस्टंट अॅड. प्रदीप तांडेल यांनी बाजू मांडल्यावर धर्मादाय आयुक्तांनी अनंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली कमिटी बरखास्त करून 2016 मध्ये अस्तित्वात असलेली सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कमिटी कायम करण्याचे आदेश दिले आहेत.
धर्मादाय आयुक्तांनी लेखी आदेश दिल्यानंतरही अनंत पाटील यांना निर्णय मान्य नसल्याने पुन्हा मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या दालनात बैठक बोलवली होती.
यावेळी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, पोलिस निरीक्षक शिरीष पवार, श्री विठोबा देवस्थान ताकई धाकटी धाकटी पंढरीचा अध्यक्ष सुधीर पाटील, सदस्य अतुल पाटील, नरेंद्र शहा, काशिनाथ पाटील, तानाजी, संदेश पाटील आदि उपस्थित होते. यात्रेला फक्त 48 तास राहिले असून, खोपोली नगरपरिषद आणि पोलिस यंत्रणा यांच्या माध्यमातून यात्रेचे नियोजन करणार असून, तहसिलदारांनी दिलेल्या सूचनांचे पालन करू अशी प्रतिक्रिया देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली आहे.