दारोदारी फिरून मच्छिची विक्री; स्थानिक कोळी महिलांचे रोजगार धोक्यात
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
दारोदारी फिरून मासे विक्री करणार्या परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी आता थेट पनवेल शहरात मासे विक्री करायला सुरुवात केल्याने स्थानिक कोळी महिलांच्या रोजगारावर गदा आली आहे. घराबाहेर न पडता थेट दारावरच मासळी उपलब्ध होत असल्याने ग्राहकदेखील परप्रांतीय मासळी विके्रत्यांकडून मासळी खरेदी करत असून, नियमांची पायमल्ली करून व्यवसाय करत असलेल्या या परप्रांतियांवर कारवाई करणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पनवेलमधील कोळीवाडा परिसरात असलेला मासळी बाजार एकेकाळी तालुक्यातील मत्स्य खवय्यांसाठी आकर्षणाचा केंद्रस्थानी होता. या बाजारात खोल समुद्रातील मासळीसोबतच खार्या व गोड्या पाण्यातील लहान-मोठी ताजी मासळी परवडणार्या दरात उपलब्ध होत असल्याने, जेवणात नियमित मांसाहार करणारे मत्स्य खवय्ये उरण नाक्यावर असलेल्या या मासळी बाजारात मोठी गर्दी करत होते. मत्स्यप्रेमींच्या या गर्दीमुळे बाजारात मासे विक्री करणार्या कोळी महिलांसोबतच आजूबाजूच्या खेड्यांमधील आदिवासी महिलांनादेखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत होता. आता मात्र परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी थेट पनवेल शहरातच दारोदारी फिरून मासे विक्री सुरु केल्याने मासळी बाजारात ग्राहकांची वाट पाहात बसणार्या मासे विक्रेत्यांसमोर रोजगार मिळवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
ग्राहकाला घरपोच मच्छी
दारोदारी फिरणार्या मासे विक्रेत्यांनी नियमित मासे खाणारे ग्राहक हेरून ठेवले आहेत. कोणता गिर्हाईक कोणत्या दिवशी मासे खातो, कोणत्या प्रकारचे मासे खाण्यास प्राथमिकता देतो, हे या विक्रेत्यांनी हेरून ठेवले असून, नियमित दिवशी न विसरता हे विक्रेते संबंधित ग्राहकांच्या घरी पोहचून आपली मासळी खपवत असल्याने दारावरच काहीशा कमी किमतीत उपलब्ध होणारे मासे खरेदीला ग्राहकदेखील पसंती देताना दिसत आहेत.
पनवेल परिसरात मासे विक्रेत्यांसाठी जागा अपुरी आहे. परिसरात वाहनतळदेखील उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. या सर्व चक्रात अडकण्यापेशा दारावर उलब्ध होणारी मासळी खरेदी केली जाते. पालिकेमार्फत प्रशस्त मासळी बाजार उपलब्ध करून दिले जाणे अपेक्षित आहे.
उमेश परशे
मासे विक्रेता