| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील ताजपूर येथील डोंगरभागात दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, ताजपूर येथील पाण्याची टाकी व विहिरीवर मातीचा ढिगारा साचला असून, टाकीचे, पाण्याच्या पाईपचे नुकसान झाल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. शनिवारी पहाटेच्या दरम्यान ताजपूर येथील डोंगरभागात दरड कोसळली. ही बाब सकाळी तेथील स्थानिकांच्या लक्षात आली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, गटविकास अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, रेवदंड्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील आदींनी धाव घेतली. परिसराची पाहणी केली. डोंगरावर असलेल्या पाण्याच्या झऱ्यामुळे माती ढासळून खाली आहे. ही माती ताजपूर येथील गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर कोसळली. बाजूला असलेल्या विहिरीतही मातीचा ढिगारा साचला. त्यामुळे टाकीसह विहिरीचेही नुकसान झाले आहे. पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. या परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
ताजपूर येथे सकाळी दरड कोसळली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे, पाईपचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली, त्याठिकाणी कोणीही जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरुपात टँकरद्वारे करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ग्रामसेवक, पोलीस पाटील उपस्थित असून, पुढील कार्यवाही सुरु आहे.
विक्रम पाटील, तहसीलदार