| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा डाक कार्यालयाच्या इमारतीलगत पासपोर्ट कार्यालय उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि.29) आयोजित केले होते. मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच उद्घाटन सोहळा होणार असल्याचे जिल्हा डाक कार्यालयाचे अधीक्षक थळकर यांनी सांगितले.
ठाणे येथे असलेल्या पासपोर्ट कार्यालयामुळे रायगडकरांची सतत धावपळ झाली होती. परंतु या धावपळीला आता ब्रेक लागणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने गेल्या अनेक महिन्यांपासून अलिबागमध्ये पासपोर्ट कार्यालयाचे काम सुरु होते. हे काम आता पुर्ण झाले असून त्याचे उद्घाटन शनिवारी (दि.29) होणार होते. त्याची तयारीदेखील जोरात करण्यात आली होती. परंतू, काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती डाक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. उद्घाटन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील असंख्य नागरिक, विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी परदेशवारीला जाण्याची संधी मिळते. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचे आहे. मात्र, हे पासपोर्ट काढण्यासाठी रायगडकारांना ठाणे रिजनल पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. पासपोर्टसाठी सतत फेऱ्या माराव्या लागत असल्याने रायगडकरांची प्रचंड धावपळ होते. रायगडकरांच्या या धावपळीला ब्रेक लागण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनासह शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत अलिबागमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट कार्यालय व्हावे, अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत शासनाने त्याला मान्यता दिली आहे.
अलिबागमधील जिल्हा डाक कार्यालयाच्या इमारतीलगतच तळ मजल्यावर पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यास सुरुवात झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून या कार्यालयाचे काम सुरु होते. अखेर हे काम पूर्ण झाले असून, ऑगस्ट महिन्यात पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.