लुबना काझी चौधरी यांची सातासमुद्रापार भरारी
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
कोकणच्या मातीतील कर्तृत्वाने आज सातासमुद्रापार मोठी भरारी घेतली आहे. कोकणच्या सुपीक मातीतून उगवलेले आणखी एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व आज जागतिक पातळीवर झळकले आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील कन्या लुबना काझी चौधरी यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास रचत अमेरिकेतील न्यू जर्सी राज्याच्या प्रशासकीय कायदा न्यायाधीश पदावर नियुक्ती मिळवली आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या पदावर विराजमान होणाऱ्या त्या विभागातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. ही नियुक्ती केवळ वैयक्तिक यश नसून, संपूर्ण रायगड जिल्हा आणि कोकणासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. एका सामान्य कुटुंबातून प्रवास सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायव्यवस्थेत मानाचे स्थान मिळवणे ही त्यांच्या जिद्दीची, मेहनतीची आणि चिकाटीची साक्ष आहे.
लुबना चौधरी यांनी शिक्षण आणि करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्टता सिद्ध केली. कठोर परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि समाजाभिमुख दृष्टीकोन यांच्या जोरावर त्यांनी अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेत आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या या नियुक्तीमुळे भारतीय महिलांची आणि विशेषतः ग्रामीण भागातील मुलींची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशाची दखल घेत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, तसेच राजकीय नेते यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही त्यांचे कौतुक होत असून, अनेक तरुण-तरुणी त्यांना आपले प्रेरणास्थान मानत आहेत. या ऐतिहासिक कामगिरीमुळे श्रीवर्धनचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले असून, ‘मोठे स्वप्न पाहा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटत राहा’ हा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला आहे. त्यामुळे लुबना काझी चौधरी यांचे सर्वस्तरातून कौतूक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा देण्यात येत आहेत.
