शेतकऱ्यांना अल्प मोबदला अन् धरण कोटयवधींवर
| पोलादपूर | शैलेश पालकर |
पोलादपूर तालुक्यात ठिकठिकाणी धरण उभारणीसाठी 2018 पासून नारळफोडी झाल्यानंतर अद्याप अनेक धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचे मोबदले मिळाले नाहीत. मात्र, 1981 मध्ये अत्यल्प असल्याने मोबदला नाकारणाऱ्या देवळे गावातील शेतकऱ्यांना 2025 मध्ये दोनवेळा भूईसपाट झालेले धरण तिसऱ्यांदा उभारण्यासाठी तिसऱ्या ठेकेदाराला 87 कोटींची संधी मिळाल्याचे दिसूनही धरणात पाणी अडेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील देवळे येथे माती बंधारा उभारण्याकामी 31 मार्च 1981 रोजी सन 1980-81च्या दरसुचीनुसार केवळ 32 लाख 60 हजार 496 रूपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली असून माती बंधाऱ्यावर चर्चा होण्यापूर्वीच एप्रिल 1994 मध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे ही योजना हस्तांतरीत झाली तेव्हा कामासाठी 1 कोटी 66 लाख 52 हजार 294 रूपये आणि अनुषंगिक खर्चापोटी 42 लाख 2 हजार 890 रूपये अशी एकूण 2 कोटी 8 लाख 55 हजार 184 रूपये अशी सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली. योजनेच्या दुसऱ्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये कामासाठी 4 कोटी 68 लाख 1 हजार 876 रूपये आणि अनुषंगिक खर्चापोटी 68 लाख 96 हजार 855 रूपये अशी एकूण 5 कोटी 36 लाख 98 हजार 731 रूपये अशी मंजूरी 31 मार्च 2005 रोजी मिळाली. या देवळे लघुपाटबंधारे योजनेचे काम ब-1 निविदांवर तीन टप्प्यांत व्ही.एस.हांडा आणि आर.के.कन्स्ट्रक्शन या पुणे येथील कंपन्यांना देण्यात आले. या कामाची सुरूवात मार्च 1997 मध्ये झाली. बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी 1998 मध्ये योजनेचे काम बंद केले होते.
यानंतर एस.पी.रेड्डी यांना विभागीय कार्यालयामार्फत पत्र देऊन सबलेटिंग करण्यास मंजूरी दिली. साधारणत: 2001 मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूसंपादनाचा अल्पसा मोबदला अदा केल्यानंतर मे 2003मध्ये योजनेचे घळभरणीचे काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यास सुरूवात केली. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या या धरणात पाणीसाठा होत असल्याची चाचणी घेतल्या-घेतल्याच धरणाची गळती सुरू झाल्याची माहिती माजी सरपंच व धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख तुकाराम केसरकर यांनी दिली.
या योजनेच्या गळतीच्या दुरूस्तीकामासाठी 1 कोटी 33 लक्ष रूपयांचे अंदाजपत्रक 2009 मध्ये मुख्यअभियंता स्थानिक स्तर प्रदेश, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले असून अंदाजपत्रकाची शेरेपूर्तता होऊन अंदाजपत्रकास मंजूरी मिळताच धरणाच्या दुरूस्तीचे काम करण्याचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता लघुपाटबंधारे स्थानिक स्तर मंडळ ठाणे यांनी सादर केल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण लघुपाटबंधारे स्थानिक स्तर मंडळ ठाणे यांनी लघुपाटबंधारे स्थानिक स्तर उपविभाग माणगांव जि.रायगडच्या माध्यमातून सन 2008-2009 दरम्यान तयार केलेल्या टिपणी अहवालामध्ये नमूद केली आहे. हा निधीही खर्च झाल्यानंतर देवळे धरणामध्ये 500 लिटर्स पाणी सुध्दा साठले नाही. मात्र, गेल्याचवर्षी 27 मे 2024 रोजी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी तत्कालीन आमदार व विद्यमान मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांनी देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने 87 कोटींचे धरण बांधण्याची घोषणा केल्याप्रमाणे पंढरपूर येथील मोरे ठेकेदार याकामी गेल्या वर्षापासून सक्रीय झाले आहेत. यंदा पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील धरण मुळापासून उच्चाटन करण्यात आल्याने सावित्री नदीपात्रावरील या धरणाचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. कोटयवधी रूपये खर्च करून दुसऱ्यांदा उभारण्यात आलेल्या धरणाचा सर्वच परिसर यंदा पूर्णपणे गायब झाला आहे.