जिल्ह्यात 81 पैकी 68 केंद्र कार्यान्वित; 12 केंद्रांच्या अंमलबजावणीला दिरंगाई
| अलिबाग | प्रमोद जाधव |
बदलते हवामान, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायमच मोठा फटका बसत आला आहे. सरकारकडून भरपाई देण्याचा गाजावाजा केला जातो. परंतु, ती भरपाई वेळेवर मिळत नसल्याची ओरड कायमच राहिली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात 81 स्वयंचलित हवामान केंद्राची गरज आहे. त्यापैकी फक्त 68 केंद्र कार्यान्वीत असून 12 केंद्राचा प्रस्ताव अजूनही लाल फितीत अडकून आले. त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने हा प्रश्न तसाच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. पावसाचे प्रमाण व हवामान यावर जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे. जिल्ह्यामध्ये सध्या 68 स्वयंचलिच हवामान केंद्र कार्यान्वित आहेत. पंतप्रधान पीकविमा योजना व हवामान आधारित फळपीक विमा योजना अशा अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी या केंद्राचा वापर केल जातो. सरकारने मान्यता दिलेल्या ‘महावेध’ या प्रकल्पाच्या अंतर्गत स्कायमेट वेदर सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून स्वयंचलित हवामान केंद्राची देखभाल दुरुस्ती करण्यापासून नवीन बसविण्याचे काम केले जाते. रायगड जिल्ह्यामध्ये 81 केंद्रांची गरज आहे. त्यापैकी 69 केंद्र उभारण्यात आली असून एका केंद्राची चोरी झाली आहे. उर्वरित 12 केंद्रासाठी कृषी विभागाकडून मार्च महिन्यामध्ये शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, पावसाळी हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी स्वयंचलित हवामान केंद्र वेळेवर उभारले गेले नाहीत. त्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्र निर्मितीबाबत शासन उदासीन असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पिक विमासारख्या योजनेसाठी लागणारी माहिती न मिळाल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत आहे. केंद्रांची उभारणी झाल्यास दुष्काळ, आग, पूर, गारपिट, ढगफुटी, थंडीची लाट व कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्वयंचलित हवामान केंद्राची मदत
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व आपत्ती व्यवस्थापनाच्या आखणीसाठी गाव पातळीवर स्वयंचलित हवामन केंद्र उभारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्र गावागावात बसविण्यात आले. तापमान, पावसाचे प्रमाण, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा यांची माहिती डिजिटल सेन्सरच्या साहाय्याने शेतकरी, हवामान शास्त्रज्ञ, प्रशासन आणि संशोधन संस्था यांना तातडीने अचूक मिळण्यास मदत होते. सापेक्ष आर्द्रतेची पातळी, वाऱ्याचा वेग आणि दिशा वायुभाराचे मोजमाप ही माहिती वेळोवेळी पोर्टलवर अद्ययावत होत राहील. त्यामुळे हवामानावर आधारित कृषी सल्ला देणे, पिकविमा दावे सुलभ करणे, संभाव्य आपत्तींची पूर्व सूचना देणे आणि हवामानविषयक संशोधन करणे या सगळ्या क्षेत्रांना स्वयंचलित हवामान केंद्राची मदत होणार आहे.
कार्यान्वित केंद्रावर दृष्टीक्षेप
तालुका | कार्यन्वित केंद्र |
अलिबाग | 8 |
मुरूड | 3 |
पेण | 5 |
पनवेल | 7 |
उरण | 3 |
कर्जत | 7 |
खालापूर | 4 |
रोहा | 5 |
सुधागड | 3 |
माणगाव | 5 |
तळा | 2 |
महाड | 7 |
पोलादपूर | 3 |
श्रीवर्धन | 3 |
म्हसळा | 3 |
रायगड जिल्ह्याला 81 स्वयंचलित हवामान केंद्र अपेक्षित असून 69 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आली आहेत. त्यातील पनवेल येथील नेरेमधील केंद्र चोरीला गेले आहे. तसेच, 12 ठिकाणी केंद्र उभारणीसाठीचा प्रस्ताव मार्च महिन्यात पाठविला आहे. ते महावेध प्रकल्प अंतर्गत स्कायमेटच्या माध्यमातून बसविले जाणार आहेत. दरम्यान, स्कायमेट वेदर सर्व्हिसेस कंपनीचा ठेका संपला होता. मात्र, आता पुन्हा चालू झाला आहे. लवकरात लकरत पुढील कार्यवाही केली जाईल.
– वंदना शिंदे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रायगड