रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग – वडळख राष्ट्रीय महामार्ग अरुंद असून या ठिकाण ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत. सुट्टीच्या दिवशी या मार्गावर वाहतूक कोंडीचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसतो. परंतु, हा रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे. पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ मार्गावर दर शनिवार व रविवार जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केला आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. यावर्षीदेखील पर्यटकांनी पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी रायगड जिल्ह्याला पसंती दर्शविली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ जिल्ह्यात वाढत आहे. वेगवेगळे धबधबे, नदी, तलावांमध्ये पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल होता. सध्या जलवाहतूक सेवा बंद आहे. त्यामुले अलिबाग – वडखळ या महामार्गावरून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दर आठवड्याच्या शेवटी येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. रुग्णवाहिकांना अडथळा, तसेच अपघाताची शक्यता वाढते. पोलिस अधीक्षक रायगड यांनी सुचविलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी जड, अवजड वाहनांना अलिबाग – वडखळ मार्गावरून प्रवेश बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी सकाळी आठ ते दुपारी दोन रविवारी दुपारी दोन ते रात्री नऊ या वेळेत जड व अवजड वाहनांना या मार्गावरून बंदी राहणार आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत तो लागू राहील. स्थानिक नागरिक व पर्यटकांना यामुळे सुरक्षित, सोयीस्कर व अडथळा विरहित प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. वाहतूक बंदीच्या वेळा लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
या वाहनांना मुभा
जड-अवजड वाहने (ट्रक, कंटेनर, डंपर इ.) इत्यादी वाहनांना बंदी असेल.तर दूध, डिझेल, पेट्रोल, एलपीजी गॅस,औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणारी वाहने,रुग्णवाहिका, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, महिला सशक्तीकरण मोहिमेसाठी नेमलेली वाहने यांना या कालावधीत मुभा असेल.