| रायगड | प्रतिनिधी |
नैसर्गिक आपत्ती, रस्ते, औद्योगिक अपघात अशा अनेक रक्ताचा तुटवडा भासू लागतो. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन केले जाते. राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिर आयोजित करण्यास सांगितले आहे. यामुळे ऐच्छिक रक्तदात्यांचा डेटाबेस तयार करण्यात मदत होणार आहे. जेणेकरून रक्ताचा तुटवडा भासल्यास रक्तदात्यांना रक्तपेढ्यांकडून बोलावणे करता येणे शक्य होणार आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्तदात्यांची नोंद करून डेटाबेस तयार करण्यात येत आहे. वर्षभरात सुमारे साडेसात हजार रक्तदात्यांची नोंद रक्तपेढ्यांमध्ये होत असल्याची माहिती जिल्हा शासकीय रक्तपेढीने दिली आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेने पत्रातून रक्तपेढ्यांना रक्तगट शिबिरे आयोजित करण्यास आणि ऐच्छिक रक्तदात्यांची नोंदणी करण्यास सांगितले आहे. तसेच, रक्तदात्याची संपूर्ण माहिती रक्तपेढीमध्ये संगणकीकृत केली जाऊ शकते. यामुळे रक्तपेढ्या विशिष्ट गटाच्या रक्तदात्यांना त्या गटाची कमतरता असल्यास कॉल करू शकतात. सर्वसाधारण काही रक्तगटांची रक्तपेढ्यांमध्ये कमतरता भासू शकते; तर काही रक्तगट पुरेसे उपलब्ध होऊ शकतात किंवा काही रक्तगट अधिक प्रमाणातही असू शकतात. रक्तपेढ्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे दुर्मिळ नकारात्मक गटांची उपलब्ध करून देणे असते. वेळोवेळी व्हॉट्सॲप आणि इतर ग्रुपवर निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त किंवा रक्तदात्यांसाठी विचारणा करणारे मेसेज येतात. रक्तदात्यांची नोंदणी करताना तरुणांवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
दर तीन महिन्यांनी नियमितपणे रक्तदान करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाऊ शकते. यातून भावी पिढीला रक्तदानाचा सकारात्मक संदेश पोहचू शकतो. राज्य सरकार संचालित असणाऱ्या शासकीय रक्तपेढयांना शिबिरांचे आयोजन आणि समुपदेशनासाठी प्रत्येकी 25 हजार रुपये दिले जाणार आहेत. अशा कार्यक्रमातून 25 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा आणि रक्तदान शिबिराच्या आयोजकांचाही सत्कार करण्यात यावा, असे सुचवण्यात आले आहे.
रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असणारा जिल्हा आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील महामार्ग आणि रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना रक्ताची गरज भासते. यामुळे जिल्हा शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ. दीपक गोसावी आणि हेमकांत सोनार यांच्या प्रयत्नांनी आणि समुपदेशनामुळे जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांमधून सुमारे साडेसात हजार रक्तदात्यांची नोंद करण्यात आली आहे.