रायगडमधील त्या आमदारांबाबत शनिवारच्या बैठकीत निर्णय घेणार

जिल्हा सेना संपर्क सल्लागार बबन पाटील यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले जिल्ह्यातील तिनही आमदार आता आमचे राहिलेले नाहीत. त्यांच्या बाबतचा निर्णय जिल्ह्यातील शिवसैनिक शनिवारी खारघर येथे आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत घेण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी दिली आहे.

बंडखोर शिनसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले शिवसेनेचे महाडचे आमदार भरतbharat गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची नावे न घेता बबन पाटील पूढे म्हणाले, जिल्ह्यातील सर्वसामान्य शिवसैनिक, तालुका प्रमुख, तालुका उप प्रमुख, विभागा प्रमुख, महिला आघाडी प्रमुख तसेच शिवसेनेचे स्थानिक स्वरांज्य संस्थांतील आजी-माजी लोकप्रतिनिधी हे सर्व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. एकही जण ईकडे तिकडे झालेला नाही.

गेल्या दोन तिन दिवसांतील या राजकीय घडामोंडींच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकारी यांची मते जाणून घेण्याकरिताच शनिवारच्या या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वांची मते, विचार आणि भावना जाणून घेऊनच काय तो निर्णय घेण्यात येईल असे बबन पाटील यांनी अखेरीस सांगीतले.

दरम्यान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या महाडमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबतच्या सर्व आमदारांचा अभिनंदन करणारे फ्लॅक्स बॅनर महाड शहरात लावण्यात आले आहेत. आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबाग मध्ये असे बॅनर प्रिंटर कडून तयार करुन घेण्यात आले आहेत, मात्र अद्याप ते सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत. तर कर्जत मध्ये शिवसैनिकांमध्ये पूर्णपणे शांतता असल्याचे दिसून आले. शनिवारच्या सेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकी नंतर जिल्ह्यात शिवसैनिकांक सक्रीय होतील अशी माहिती या निमीत्तीने सेनेच्याच एका पदाधिकार्‍याने दिली आहे.

Exit mobile version