। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबतच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तिन्ही आमदार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आमदारांच्या बाबतचा सस्पेन्स संपला असून या तिघांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचे महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरत गोगावले, अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आ. महेंद्र दळवी तसेच कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देत सुरत गाठले. त्यानंतर आता हे सारे आमदार आसाममधील गुवहाटी येथील रॅडिसन हॉटेलला पोहोचले आहेत.
सध्या सोशल मिडियावर शिंदे गटाच्या आमदारांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. यात रायगड जिल्ह्यातील हे तिन्ही आमदार दिसत आहेत. एकंदरीत रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांची बंडखोरी केले हे स्पष्ट झालेले आहे.दरम्यान, मंगळवारी (दि.21) शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या यादीत रायगडमधील आमदारांची नावे मीडियात झळकत होती. याला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. मात्र आज प्रत्यक्ष छायाचित्रात रायगडचे आमदार पाहून सर्वानाच बंडखोरीची खात्री पटली आहे.