अलिबाग रुग्णालयात उपचारासाठी दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग शहरात रविवारी भटक्या कुत्र्यांनी एका दिवसात पंधरा जणांचा चावा घेतला. ही घटना चेंढरे येथील रायवाडी व मेटपाडा येथे घडली. सहाजण गंभीर जखमी असून त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत एका पांढऱ्या कुत्र्याने मोठी दहशत निर्माण केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या पादचाऱ्यांसह अनेक नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. रविवारी सकाळी दोन महिला कामगार, एक महिला वयोवृध्द, हमालासह पंधरा जणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागलेे. यातील काहींना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले. मात्र दोन महिला व एक पुरुष तसेच अन्य तिघे असे सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. कुत्र्याने हल्ला केलेल्या सर्व जखमींना इजेंक्शन देण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग नगरपरिषदेने यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नेहमीप्रमाणे सकाळी रायवाडी परिसरात मॉर्निंग वॉकला जात होते. पावणेआठ वाजण्याच्या दरम्यान एका कुत्र्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्याने पायाला चावा घेतला. त्यामुळे दुखापत झाली.
निर्मला पाटील, चेंढरे
मी हमाल आहे. अलिबागमधील मेटपाडा येथे मालाची वाहतूक करीत होतो. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका कुत्र्याने माझ्यावर हल्ला करून चावा घेतला. त्यामुळे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलो.
कन्हैया सिंग
