अलिबागमध्ये भरणार मराठी उद्योजकांचा मेळा

सॅटर्डे क्लबचा पुढाकार

| अलिबाग | वार्ताहर |

सॅटर्डे क्लब, अलिबाग शाखा व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता दिवस हा कार्यकम दि. 17 जुलै, दु. 4 ते 6 या वेळेत आदर्श भुवन हॉल, येथे साजरा होणार आहे. अजित मराठे, निर्माण ग्रुप, बोर्ड ऑफ ट्रस्टी सॅटर्डे क्लब व जी. एस. हरळय्या, जनरल मॅनेजर डि. आय. सी. रायगड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अलिबागमधील काही ख्यातनाम उद्योजकांच्या मुलाखतींचे आयोजन या प्रसंगी केले आहे. ब्रीज इंजीनिअर भिडे यांनी सॅटर्डे क्लबची स्थापना 2000 साली केली. मराठी व्यवसायिकांनी एकत्र येऊन ऐकमेकांच्या सहाय्याने व्यवसाय करावा असे त्यांचे स्वप्न होते. मराठी माणसाची उद्योजकीय मानसिकता घडविण्याचा, मराठी माणसाला श्रीमंत करण्याचा दृढनिश्‍चय त्यांनी केला होता. आपले ध्येय उराशी बाळगून संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरले. अनेक लोकांना त्यांनी आपल्या या ध्येयाशी जोडले. जिथे जाऊ तिथे क्लब बद्द्ल व व्यवसायाबद्दल भरभरून बोलायचे. मराठी माणसाबद्दल तळमळ बघून पुढे अनेकजण या संस्थेमार्फत जोडले गेले. त्यांनी लावलेल्या सॅटर्डे क्लबच्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. या संस्थेच्या 89 शाखा आणि साडेचार हजारांहून अधिक व्यावसायिक सभासद आहेत.

12 जुलै हा संस्थेचा वर्धापन दिन. या दिवशी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उद्योजक एकत्र आले. म्हणून या दिवशी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. परस्पर सहकार्यावर आधारित, श्रीमंत व एकसंघ महाराष्ट्रीयन व्यावसायिक समाजाची उभारणी करण्याचा हा महान उद्देश महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांपर्यंत पोहोचावा यासाठी, संस्था हा दिवस मराठी उद्योजकता दिवस म्हणून साजरा करते. यावेळी अनिल म्हात्रे, अभिजीत पाटील हे या परिसंवादात सहभागी होतील. या कार्यक्रमास रायगड जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित राहतील. 17 जुलै रोजी होणार्‍या या मेळाव्याला जास्तीत जास्त उद्योजकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विजय राणे व संजय पाटील यांनी केले आहे. हा सोहळा पूर्णपणे मोफत असणार आहे. मात्र नाव नोंदणी अनिवार्य असणार आहे.

Exit mobile version