। पॅरिस । वृत्तसंस्था ।
भारताची युवा नेमबाज अवनी लेखरा हिला पॅरालिम्पिकमधील चौथ्या पदकापासून दूरच रहावे लागले आहे. टोकियो पॅरालिंपिकमध्ये दोन पदकांची कमाई केल्यानंतर अवनी हिने पॅरिसमध्येही 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावत आपली चमक दाखवली आहे. मात्र, रविवारी (दि.1) पार पडलेल्या 10 मीटर एअर रायफल प्रोन (एसएस1) या मिश्र प्रकारात तिच्याकडून निराशा झाली. सिद्धार्थ बाबू 10 मीटर एअर रायफल प्रोन (एसएस 1) व श्रीहर्षा दवारेड्डी (एसएच 2) यांनाही अपयशाचा सामना करावा लागला. अवनी हिची 11व्या, तर सिद्धार्थ याची 28व्या आणि श्रीहर्षा याची 26व्या स्थानावर घसरण झाली आहे.
अवनीने10 मीटर एअर रायफल (एसएस 1) प्रकारात सुवर्णपदक पटकावताना देदीप्यमान कामगिरी केली होती. त्यामुळे मिश्र प्रकारातही तिच्याकडून मोठी अपेक्षा बाळगली जात होती. परंतु, तिला 105.7, 106.0, 104.1, 106.0, 104.8, 106.2 अशी गुणांची कमाई करता आली. अवनीने एकूण 632.8 गुण कमावले. सिद्धार्थला 104.6, 103.8, 105.7, 104.9, 103.6. 105.7 अशी गुणांची कमाई करता आली. त्याने एकूण 628.3 गुणांची कमाई केली.