। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
महाराजा टी-20 लीगमध्ये उल्लेखनीय कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या समित द्रविडची भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 एकदिवसीय व 2 चार दिवसीय सामन्यांसाठी राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय संघात निवड झाली आहे. अष्टपैलू समितने 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत 2016 मध्ये 125 धावांची खेळी केली होती. त्याने 2018 मध्ये कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या 14 वर्षांखालील शालेय स्पर्धेत 150 धावा चोपल्या होत्या. 2019 मध्येही 14 वर्षांखालील सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. कुच बिहार ट्रॉफी 2024 स्पर्धेतही कर्नाटकला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने या स्पर्धेत 8 सामन्यांमध्ये 362 धावा केल्या आणि 16 बळी देखील घेतले होते. तसेच, आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेतही 4 सामन्यांत जवळपास 130 धावा ठोकल्या होत्या.
समितच्या 19 वर्षांखालील भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याचे कोच कार्तिक जेस्वनाथ यांनी राहुल द्रविडने मुलाला दिलेल्या सल्ल्याबाबत सांगितले आहे. ते म्हणाले की, राहुलने मिळवलेल्या प्रसिद्धीत हरवून न जाता स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा त्याला सल्ला मिळाला होता. आपल्या वडिलांची प्रसिद्धी पाहत समित मोठा झाला आणि त्याला हे माहीत होते की त्याचे प्रचंड दडपण पुढे जाऊन असेल. यामुळेच राहुल आणि मी त्याला एक सल्ला दिला की, बाहेर काय चर्चा सुरू आहे किंवा काय घडतंय याची पर्वा करू नकोस. मैदानावर तू जी कामगिरी करशील त्यावरूनच तुझी निवड केली जाईल. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रीत करण्यास समितला सांगितल्याचे कार्तिक यांनी सांगितले.