। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।
भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा व त्याची इंडोनेशियाची जोडीदार अल्दिला सुतजियादी या जोडीने अमेरिकन ओपन टेनिस या ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल केली आहे. रोहन-अल्दिला या आठव्या मानांकित जोडीसमोर ऑस्ट्रेलियाचा जॉन पिअर्स व झेक प्रजासत्ताकची त्याची साथीदार कॅटरिना सिनीकोवा या जोडीचे आव्हान होते. मात्र, जॉन व कॅटरिना या जोडीने माघार घेतल्यामुळे रोहन-अल्दिला या जोडीला पुढे चाल देण्यात आली आहे. पुढल्या फेरीत रोहन-अल्दिला या जोडीसमोर मॅथ्यू एब्डेन-बार्बोरा क्रेझीकोव्हा या जोडीचे आव्हान असणार आहे.
जॉन पिअर्स-कॅटरिना सिनीकोवा या जोडीने पहिला सेट 6-0 असा जिंकत आघाडी मिळवली होती. यानंतर दुसर्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर रोहन बोपण्णा-अल्दिला सुतजियादी या जोडीने हा सेट 7-6 असा जिंकत बरोबरी साधली होती. मात्र, याचदरम्यान जॉन-कॅटरिना या जोडीने माघार घेतली. यामुळे एक तास व 13 मिनिटांच्या खेळानंतर ही लढत थांबवण्यात आली व रोहन-अल्दिला या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल मिळाली आहे.