। लंडन । वृत्तसंस्था ।
भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्ये लिस्टरशायरकडून खेळत असून त्याने नुकतेच काउंटी क्रिकेटमध्ये शतक केले आहे. त्याच्या या खेळामुळे लिस्टरशायरला ग्लॅमॉर्गनविरुद्ध सामना अनिर्णत राखण्यात यश मिळाले आहे.
रहाणेने कार्डिफला झालेल्या या सामन्यात दुसर्या डावात 192 चेंडूत 102 धावांची खेळी केली होती. या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार मारले. या सामन्यात लिस्टरशायरला पहिल्या डावात 299 धावांची पिछाडी स्विकारावी लागली होती. यानंतर दुसर्या डावात त्यांची अवस्था 74 धावांवर 3 बळी अशी अवस्था झाली होती. पण अजिंक्य रहाणे आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी डाव सावरताना चौथ्या बळीसाठी 183 धावांची भागीदारी केली. या भागीदारी दरम्यान रहाणेने शतक देखी पूर्ण केले. अजिंक्य रहाणेचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 40 वे शतक होते. तो गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार खेळ करत आहे.
लिस्टरशायरकडून एकदिवसीय चषकामध्येही खेळताना त्याने महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्याने 10 सामन्यांत 4 अर्धशतके केली होती. विशेष म्हणजे 19 सप्टेंबर रोजी भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. यापूर्वी रहाणेने ही दमदार खेळी केली आहे. त्यामुळे आता त्याच्यासाठी पुनरागमनाचे दार उघडणार का, हे पाहावे लागणार आहे.