। लंडन । वृत्तसंस्था ।
इंग्लड क्रिकेट संघाने रविवारी (दि.1) श्रीलंकेविरुद्ध दुसर्या कसोटीत 190 धावांनी विजय मिळवला आहे. लॉर्ड्सवर मिळवलेल्या या विजयासह इंग्लंडने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडीही घेतली आहे. इंग्लंडच्या या विजयात गस ऍटकिन्सन आणि जो रुट यांचा मोठा वाटा राहिला आहे.
या सामन्यात श्रीलंकेसमोर दुसर्या डावात इंग्लंडने 483 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला 86.4 षटकात सर्वबाद 292 धावांच करता आल्या. श्रीलंकेकडून दिनेश चंदिमलने 58 धावांची खेळी केली, तर दिमुथ करुणारत्नेने 55 आणि कर्णधार धनंजय डी सिल्वाने 50 धावांची खेळी केली. तसेच, मिलन रत्नायकनेही 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत 43 धावांची झुंज दिली. मात्र, या डावातही श्रीलंकेला ऍटकिन्सन भारी पडला. त्याने 5 बळी घेतले. तसेच, ख्रिस वोक्सने 2 आणि शोएब बशीरने 1 बळी घेतला.
तत्पुर्वी, या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 102 षटकात सर्वबाद 427 धावा केल्या होत्या. या डावात जो रुटने 206 चेंडूत 143 धावा केल्या. तसेच, गस ऍटकिन्सनने 115 चेंडूत 118 धावांची आक्रमक खेळी केली होती.श्रीलंकेकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना असिथा फर्नांडोने सर्वाधिक बळी घेतले होते. तसेच, मिलन रत्नायके आणि लहिरु कुमारा यांनी प्रत्येकी 2 बळी तर प्रभात जयसूर्याने 1 बळी घेतला.