खरेदीसाठी मोठी गर्दी
| सुधागड-पाली | वार्ताहर |
पावसाळा नुकताच सरला आहे. त्यामुळे नदी, तलाव, ओहळ, शेतातील साठलेले पाणी आदी गोड्या पाण्यातील मासेमारी जोरात सुरू आहे. सध्या गोड्या पाण्यातील विविध मासे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. खवय्यांच्या उड्या आता चविष्ट गोड्या पाण्यातील मासे, तसेच गोड्या चिंबोऱ्यांवर पडत आहेत. हे मासे सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत असल्याने खवय्यांना मेजवानी मिळत आहे.
नदी किनारी, ओहळ, शेतात आणि डोंगर कपारीत सापडणाऱ्या गोड्या पाण्यातील विषेशतः काळ्या पाठीच्या चिंबोऱ्या सध्या मुबलक मिळत आहेत. पौष्टीक आणि चविष्ट अशा या चिंबोऱ्या खवय्ये चवीने खातात. तसेच नद्या, तलाव, धरण, पाणवठे, ओढे, ओहळ, शेतात साठलेले पाणी अशा गोड्या पाण्यात सापडणाऱ्या माशांची आवकदेखील वाढली आहे. त्यामध्ये मळे, कोलीम, म्हुऱ्या, शिवडा, अरलय, वाम, कोलंबी, कटला, फंटूस व खवल आदी माशांचा समावेश आहे. मळे व म्हुऱ्या हा प्रकार या दिवसात अधिक मिळतो. त्यामुळे खवय्ये आवर्जून खरेदी करतात. काहीजण तर मुंबई, ठाणे आदी शहरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांनादेखील भेट देतात.
कोळी बांधवांबरोबरच प्रामुख्याने आदिवासी आणि गळभोई समाजातील लोक खूप मेहनतीने हे मासे व चिंबोऱ्या पकडतात. या विक्रीतून त्यांच्या हाती चार पैसे मिळतात. नदी, तळा, धरण येथे टायर ट्यूबवर बसून गाळाने व जाळी टाकून मासेमारी होते. तर, शेतातील साठलेले पाणी काढून मासे पकडले जातात.
पावसाळा संपल्याने मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्यातील मासेमारी केली जात आहे. सध्या मासेदेखील खूप मिळत आहेत. त्यामुळे उदरनिर्वाह चांगला सुरू आहे.
जितेश दळवी,
मासेमार, टेंबी वसाहत
सध्या गोड्या पाण्यातील मासे खूप मिळत आहेत. शहरात असणाऱ्या नातेवाईकांना आवर्जून भेट म्हणून गोडे मासे नेले आहेत. मळे, शिवडा, कटला व म्हूऱ्या हे मासे अनेकांना खूप आवडतात.
प्रियांका गोसावी,
गृहिणी, माणगाव
मळे- यावर्षी 50 रुपये पाव, तर 200 रुपये किलो. मागील वर्षी 40 रुपये पाव, तर 150 रुपये किलो. कोलीम (बारीक कोळंबी)- यावर्षी 40 रुपये वाटा, मागील वर्षी 30 रुपये वाटा म्हुऱ्या- यावर्षी 40 रुपये वाटा, मागील वर्षी 30 रुपये वाटा शिवडा, कटला व वाम- यावर्षी 500 ते 550 रुपये, मागील वर्षी 400 रुपये किलो. मोठी गोडी कोलंबी- यावर्षी 1000 ते 1200 रुपये, तर मागील वर्षी 800 ते 1000 रुपये किलो. फंटूस- यावर्षी 300 ते 400 रुपये, तर मागील वर्षी 200 ते 250 रुपये किलो.