आठ संघांमध्ये ‌‘काँटे की टक्कर’; अंतिम 16 चा थरार संपला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत फुटबॉल चाहत्यांना अखेरच्या क्षणातील विजयी गोल, धक्कादायक निकाल, अविश्वसनीय पुनरागमन आणि भावनिक निरोप असे सर्वकाही पाहायला मिळाले. आता अंतिम 16 चा थरार संपला असून, ही स्पर्धा अंतिम आठ संघांपर्यंत मर्यादित झाली आहे.

अंतिम 16 मधील पहिल्या सामन्यात मोरोक्कोने यजमान कॅनडाचा पराभव करून बाद फेरीची सुरुवात दमदार केली होती. कतारमध्ये 2022मध्ये झालेल्या स्पर्धेतील कामगिरी प्रभाव पुढेही त्यांनी कायम ठेवला. तर, कॅनडाचा संघ इतिहासात प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहचला होता. दुसऱ्या सामन्यात पॅराग्वेने फ्रान्सला कडवी झुंज दिली. परंतु, अखेरीस किलियन एम्बाप्पेच्या पेनल्टीच्या जोरावर फ्रान्सने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर या फेरीतील सर्वात मोठा धक्का न्यू जर्सी येथे बसला. याठिकाणी नॉर्वेने ब्राझीलचा मोठा पराभव केला. एर्लिंग हालांडच्या दोन गोलांमुळे पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलचा प्रवास संपला. आणि त्यानंतर नेयमार ज्युनिअरने आपल्या अखेरच्या विश्वचषक सामन्यात पेनल्टीवर गोल करत निरोप घेतला. चौथ्या सामन्यात इंग्लंडने यजमान मेक्सिकोविरुद्ध नाट्यमय विजय मिळवला. त्यामुळे मेक्सिकोही स्पर्धेतून बाहेर झाले. त्यानंतरच्या सामन्यात आणखी एका महान खेळाडूचा विश्वचषक प्रवासही संपला. अतिरिक्त वेळेत मिकेल मेरिनोच्या गोलमुळे स्पेनने पोर्तुगालला पराभूत केले आणि क्रिस्टियानो रोनाल्डोच्या गौरवशाली विश्वचषक कारकिर्दीचा भावनिक शेवट झाला.

सहाव्या सामन्यात यजमान अमेरिका व बेल्जियमच्या सामन्यापूर्वी फोलारिन बालोगुनवरील रेड कार्ड निलंबन मागे घेण्याच्या निर्णयावरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. मात्र, बेल्जियमने अमेरिकावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतरच्या सामन्यात गत विजेता अर्जेंटिनाने इजिप्तविरुद्ध स्पर्धेतील सर्वात संस्मरणीय पुनरागमन केले. 2-0 ने पिछाडीवर असताना लिओनेल मेस्सीच्या प्रेरणादायी खेळीमुळे अर्जेंटिनाने 13 मिनिटांत तीन गोल करत विजय मिळवला. शेवटच्या सामान्यामध्ये स्वित्झर्लंडने कोलंबियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करून अंतिम आठ संघांची यादी पूर्ण केली. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्को विरुद्ध फ्रान्स, स्पेन विरुद्ध बेल्जियम, नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि स्वित्झर्लंड विरुद्ध अर्जेंटिना असे सामने रंगणार आहेत.

उपांत्य फेरीचे वेळापत्रक
10 जुलै - मोरोक्को विरुद्ध फ्रान्स (मध्यरात्री 1.30 वा.)
11 जुलै - स्पेन विरुद्ध बेल्जियम (मध्यरात्री 12.30 वा)
12 जुलै - नॉर्वे विरुद्ध इंग्लंड (मध्यरात्री 2.30 वा)
12 जुलै - स्वित्झर्लंड विरुद्ध अर्जेंटिना (पहाटे 6.30 वा).
Exit mobile version