। पनवेल । वार्ताहर ।
मेंटेनन्सच्या पैशांवरून झालेल्या वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याची घटना तळोजा येथील एम. एम. ॲव्हेन्यु गृहनिर्माण सोसायटीमध्ये घडली. या हाणामारीत सोनवणे कुटुंबाने नाविक पिता-पुत्रावर लोखंडी कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. तळोजा पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
तळोजा येथील कोयनावळे, घोट कॅम्प परिसरातील एम. एम. ॲव्हेन्यु या इमारतीचे बांधकाम करणारा बिल्डर सन्ना उल्ला खान आणि जमीन मालक यांच्यामध्ये वाद झाल्याने सन्ना खान याने या इमारतीचे बांधकाम अर्धवट सोडले आहे. या अर्धवट इमारतीत सध्या 16 कुटुंबे राहतात. रहिवाशांच्या विनंतीवरून त्याच इमारतीत राहणारे दिनेश नाविक (47) हे सोसायटीचा कारभार पाहत आहेत. गत डिसेंबरपर्यंत 500 रुपये इतका मेंटेनन्स काढण्यात येत होता. मात्र, सोसायटीच्या बैठकीत सर्वांच्या संमतीने जानेवारी 2026 पासून तो 650 रुपये ठरवण्यात आला होता. मात्र, विश्वास सोनवणे आणि त्यांचे कुटुंबीय जुन्या दराने मेंटेनन्स देण्यावर ठाम होते. त्यावर आशुतोष सोनवणे याने दिनेश नाविक यांना मेंटेनन्स देण्याच्या बहाण्याने खाली बोलावले. या वेळी झालेल्या बाचाबाचीनंतर विश्वास सोनवणे यांची ऋषिकेश आणि अशुतोष ही दोन मुले हातात कोयता घेऊन आले व त्यांनी दिनेश नाविक यांच्या उजव्या डोळ्यावर वार केला. या वेळी वडिलांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा देवा नाविक मध्ये गेला असता, ऋषिकेशने त्याच्या डोक्यावरही कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या वेळी झालेला गोंधळ एकून दिनेश यांची पत्नी आणि मुलगी मदतीसाठी पुढे आली. या वेळी नाविक यांची पत्नी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना ऋषिकेशने त्यांचा मोबाईल हिसकावून जमिनीवर फेकून फोडून टाकला. तर सोनावणे याच्यासोबत असलेल्या अनोळखी महिलेने नाविक यांच्या पत्नी व मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी देवा नाविक यांनी दिलेल्या तक्रारीवरून तळोजा पोलिसांनी, विश्वास सोनवणे, ऋषिकेश, आशुतोष व एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.





