। मुंबई । वृत्तसंस्था ।
नथुरामच्या उदात्तीकरणाचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होवू देणार नसल्याची रोखठोक भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केली आहे. याबाबत प्रसारमाध्यमांसह संवाद साधताना पटोले म्हणाले की, महात्मा गांधींच्या मारेकर्यांना तुम्ही नायक म्हणून दाखवत असाल तर त्याचं समर्थन करू शकत नाही. आपल्या देशाला गांधींजी आणि त्यांची विचारसरणी माहिती आहे. संपूर्ण जगाला गांधीजी माहिती आहेत. पण, या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या मारेकर्यांना नायक बनवण्याचं काम चाललंय. काँग्रेस त्याचा विरोध करणार आहे. तसेच हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ नये, यासाठी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
येत्या 30 जानेवारीला ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. त्यांनी स्वतः फेसबुक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली. त्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमोल कोल्हेंना पाठिंबा देताच आव्हाडांनीही पलटी मारली. कलाकार म्हणून त्यांनी भूमिका साकारली असं पवार म्हणाले होते. तसेच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी देखील हीच भूमिका घेत कोल्हेंचं समर्थन केले आहे. याशिवाय चित्रपटावरून वाद निर्माण होताच अमोल कोल्हेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. कलाकार आणि राजकीय आयुष्य अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ते एक समजण्याची गल्लत करू नये. मी ती भूमिका साकारली म्हणजे माझे विचार तसेच असेल असं नाही. एक कलाकार म्हणून ती भूमिका साकारली. त्यावेळी मी कुठल्याही राजकीय पक्ष आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नसल्याचे प्रतिपादन कोल्हे यांनी केले आहे.