अलिबाग जेट्टीनजीक मासेमारी होडी बुडाली

सुमारे चार लाखांचे नुकसान; सुदैवाने जीवित हानी नाही

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबाग किनाऱ्यावरील जेट्टी परिसरात मुसळधार पाऊस, भरतीच्या लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नांगरून ठेवलेली मासेमारी नौका बुडाली. हवामान बदलामुळे ही नौका किनाऱ्यावरच होती. पाऊस थांबल्यानंतर नौका शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु नौका लाटांच्या प्रवाहात समुद्रात वाहून गेली असल्याचा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. नौका मालकाचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कोळी बांधवांनी संगितले.

मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यात पावसाळी वातावरण होते. यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. यामुळे कस्टम बंदरातील नाखवा राकेश बळीराम भगत यांनी आपली मासेमारी नौका बंदरावर नांगरून ठेवली होती. सायंकाळी वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा , मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरतीच्या लाटांच्या माऱ्यात मासेमारी नौकेचा टिकाव लागला नाही. यामुळे नौका अलिबाग समुद्रातील बंदर परिसरात बुडाली. नौका बुडाली तेव्हा नौकेत कोणीही खलाशी नव्हते. यामुळे बीटीचे चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

बुडालेली मासेमारी नौका शोधण्याचा प्रयत्न स्थानिक कोळी बांधवांनी केला. परंतु नौका सापडली नाही. समुद्राच्या लाटांच्या प्रवाहात बोट समुद्रात वाहून गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version