माणगावात उनाड घोड्यांचा उच्छाद

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा संताप

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरात गेल्या महिनाभरापासून चार उनाड आणि बेलगाम घोड्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, जंगली श्वापदे आणि मोकाट जनावरांनी देखील शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस सुरू केली आहे. दिवसा शहरातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर मुक्तपणे फिरणारे हे घोडे रात्रीच्या वेळी शेतांमध्ये घुसून पिकांचे नुकसान करीत असल्याने नागरिकांसह शेतकरीही भयभीत झाले आहेत. एकीकडे रस्त्यांवरील वाहतुकीला धोका, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास हिरावला जात असल्याने प्रशासन नेमके काय करतय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

यंदा माणगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आधीच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भातशेतीसोबतच कडधान्य, कलिंगड, भाजीपाला आणि विविध फळपिकांची लागवड केली. महिनाभराच्या मेहनतीनंतर कडधान्याची पिके चांगली बहरू लागली होती. मात्र, रात्रीच्या अंधारात रानडुक्कर, मोकाट गुरेढोरे, मोर, लांडोर आणि अन्य जंगली प्राणी शेतांमध्ये घुसून उभ्या पिकांची अक्षरशः नासधूस करीत आहेत.

माणगाव शहरात गेल्या महिनाभरापासून चार बेवारस घोडे महामार्गासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बिनधास्तपणे फिरत आहेत. भरधाव वाहतुकीच्या रस्त्यांवर अचानक घोडे आडवे येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना त्यांच्यापासून बचाव करत मार्ग काढावा लागत आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये या घोड्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे घोडे नेमके कोणाचे, त्यांची जबाबदारी कोणाची आणि त्यांचा बंदोबस्त कोण करणार, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

त्यातच माणगावजवळील खांदाड, नानोरे, भादाव, रीळा, पाचोळा, बामणोली, निळगुण, कळमजे यांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये जंगली प्राणी आणि मोकाट जनावरांनी शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कडधान्य, भाजीपाला, कलिंगड आणि अन्य पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ज्या पिकांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, तीच पिके नष्ट होत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. या संकटावर मात करण्यासाठी अनेक शेतकरी रात्रभर जागता पहारा देत आहेत. हातात काठ्या घेऊन शेताच्या बांधावर गस्त घालत आहेत. मात्र, एवढी काळजी घेऊनही जंगली प्राण्यांचा उपद्रव थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसभर शेतात राबायचे आणि रात्रभर पिकांच्या रक्षणासाठी जागायचे, अशी दुहेरी कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

Exit mobile version