शब्दांच्या सरींनी रंगली साहित्य मैफल
| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पीएनपी कला विकास मंडळाच्या वतीने ‘साहित्यप्रभा’ आयोजित काव्य संमेलन उत्साहात पार पडले. रविवार, दि. 10 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या या ‘काव्यप्रभा’ साहित्य मैफिलीत राज्यभरातील कवी, साहित्यिक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शब्दांची अनोखी बरसात अनुभवली.
कार्यक्रमाला पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह तथा पीएनपी कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील प्रमुख उपस्थित होत्या. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचे चिरंजीव मुकुल खेबुडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी रायगडचे भाग्यविधाते स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजलीही वाहण्यात आली.
काव्य संमेलनाचे प्रास्ताविक पीएनपी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कवी डॉ. ओमकार पोटे यांनी केले. प्रमुख पाहुणे मुकुल खेबुडकर यांनी आपल्या मनोगतातून वडील जगदीश खेबुडकर यांच्या आठवणींना उजाळा देत काही निवडक कविता सादर केल्या.
‘माझी आठवणीतील शाळा’, ‘हरवलेले बालपण’ आणि ‘माती’ हे विषय यंदाच्या काव्य संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले. या विषयांवर आधारित पन्नासहून अधिक कवींनी आपल्या स्वलिखित कविता सादर केल्या. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या कवींच्या सहभागामुळे संमेलनाची रंगत अधिक वाढली. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये श्रीकांत पाटील, किशोर म्हात्रे, कैलास पिंगळे, के.डी. पाटील, निर्मला फुलगावकर, वर्षा दिवेकर, प्रा. दिनेश पाटील, काव्यप्रभा समन्वयक प्रा. मिलिंद घाडगे तसेच स्माईल टीमचे मयूर मोरे, सोहेल छापेकर, हर्षाली सानप, श्रुती टावरी, यश बनसोडे, ओम मुकादम आणि सुबोध पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संपदा शिंदे यांनी केले, तर उपस्थित साहित्यिक व कवींचे आभार पीएनपी कला विकास मंडळाचे उपाध्यक्ष विक्रांत वार्डे यांनी मानले.
साहित्य आणि लेखणीतूनच क्रांती जन्म घेते : चित्रलेखा पाटील
आपल्या अध्यक्षीय भाषणात चित्रलेखा नृपाल पाटील यांनी साहित्याची समाज परिवर्तनातील भूमिका अधोरेखित केली. इतिहास साक्षी आहे की, अनेक सामाजिक आणि वैचारिक क्रांती या साहित्य आणि लेखणीतूनच जन्माला आल्या आहेत. त्यामुळे साहित्यिकांनी आणि कवींनी सकारात्मक विचार समाजासमोर मांडणे ही काळाची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच नवोदित कवींनी आपली लेखणी समाजहितासाठी वापरावी आणि संवेदनशील साहित्यनिर्मितीतून समाजाला दिशा द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.









