। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतातील बंदर व गोदी कामगारांसाठी 1 जानेवारी 2022 पासून पाच वर्षासाठी लागू होणारा भरघोस पगारवाढीचा वेतन करार मुंबईत संपन्न झाल्यानंतर, पुणे जिल्ह्यामधील जुन्नर, आंबेगाव व राजगुरुनगर तालुक्यातील सेवानिवृत्त गोदी कामगारांचा आनंदोत्सव मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुंबई गोदी कामगार सेवानिवृत्त संघाच्यावतीने 12 ऑक्टोबर रोजी जुन्नर तालुक्यातील माई वडेवाले सभागृहात सेवानिवृत्त गोदी कामगारांचा आनंदोत्सव मेळावा मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड असोसिएशनचे अध्यक्ष सी.जे. मेंडोसा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, मुंबई येथे झालेल्या गोदी कामगारांच्या वेतन करारात नोकरीत असलेल्या कामगारांना भरघोस पगारवाढ मिळाली असून, पेन्शनर्सना देखील चांगली पेन्शनवाढ झाली आहे. या वेतन करारात पेन्शनवाढीचा कायदेशीर समावेश करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कामगारांच्या प्रलंबित मागण्या या वेतन करारात मान्य झाल्या असून, याचे सर्व श्रेय सहा गोदी कामगार महासंघांच्या नेत्यांना व इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटा यांना आहे. या सभेला ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे माजी सचिव मोहम्मद अली, मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस डी .एच. डिंग्रेजा, गोवेकर, माईकल कोलॅसो, वसंत गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.







