अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची सुवर्णसंधी

| रायगड | प्रतिनिधी |

तंत्रज्ञानाच्या युगात महावितरणने पाऊल टाकत राज्यातील 3 कोटी 16 लाख ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटर लावण्यात येत असून, अचूक बिलिंग, पारदर्शकता आणि थेट वीजदरात सवलत देणारी ही योजना सध्या राज्यात गतिमानतेने राबविली जात आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांचा अनुभव पूर्णपणे बदलणार असून, स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेत 9 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत स्मार्ट मीटर पंधरवडा सर्वत्र साजरा करण्यात येत आहे.

मानवी हस्तक्षेपाशिवाय मीटर रीडिंग थेट महावितरणच्या सर्व्हरवर पोहोचणार आहे. यामुळे चुकीचे रीडिंग, अंदाजे बिल किंवा घर बंद असल्याने बिल न मिळणे यांसारख्या तक्रारींना पूर्णविराम मिळेल. आयोगाच्या मान्यतेनुसार, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळणार आहे. ही सवलत 1 जुलै 2025 पासून लागू झाली असून घरगुती ग्राहकांसाठी हे मोठे आर्थिक बचत करणारे पाऊल आहे. हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ग्राहकांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. स्मार्ट मीटरबाबत असलेला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ते प्रीपेड आहेत. मात्र, हे मीटर पोस्टपेडच असून सध्याप्रमाणेच वीज वापरल्यानंतर महिना अखेरीस बिल भरावे लागणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर पॅनेल बसवणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर उपयुक्त आहेत. सौर ऊर्जेची निर्मिती, वापर आणि ग्रीडला दिलेल्या विजेचा हिशेब स्मार्ट मीटरमुळे होणार आहे.

Exit mobile version