पीएनपी एज्युकेशन सोसायटी व आयईएसपीचा उपक्रम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी (दि.16) अलिबाग येथे विशेष रोजगार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात सायंकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शेकाप प्रवक्त्या तथा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना मिळाव्यात, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमात विमानतळ क्षेत्रातील विविध नोकरीच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. अनुभवी तज्ज्ञांकडून करिअर मार्गदर्शन, काऊन्सेलिंग, शंका निरसन, थेट मुलाखती व प्राथमिक निवड प्रक्रिया यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षण आणि प्लेसमेंटसंदर्भातील संपूर्ण माहितीही युवकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. योग्य प्रशिक्षण, विश्वासार्ह मार्गदर्शन आणि उज्ज्वल भविष्यासाठी ही मोठी संधी आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
