। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील साळाव येथील जिंदल विद्या मंदिरात नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन, सत्कार आणि पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. यंदाच्या कार्यक्रमाचे शीर्षक ‘धरोहर’ होते, ज्याअंतर्गत ‘आपली संस्कृती, आपला वारसा’ हा विषय प्रत्येक नृत्यातून सादर करण्यात आला. यावेळी, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य आणि देखणे सादरीकरण या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून साळाव येथील जे.एस.डब्ल्यू. कंपनीचे प्रमुख पंकज मलिक आणि नीलू मलिक हे उपस्थित होते. समारंभादरम्यान प्राचार्य मुकेश ठाकूर यांनी शाळेचा वार्षिक प्रगती अहवाल सादर केला, ज्यामध्ये शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे विवरण होते. तसेच, त्यांनी शिक्षकवृंद आणि पालकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी, विद्यार्थ्यांनी शालेय जीवन, झाडे लावा, झाडे जगवा, मोबाईलचे दुष्परिणाम, सुर-असुर आणि मंगल पांडे (जीवन कहाणी) या विषयांवर नृत्य सादर केले. तसेच, सर्वांचे आकर्षण ठरलेले शिवराज्यभिषेक सोहळ्याचे सादरीकरण करण्यात आले. सर्व शालेय विद्यार्थ्यांनी आकर्षक शिवकालीन पोशाख व दमदार सरावामुळे हा शिवराज्यभिषेक सोहळा देखणा व दिमाखदार पणे संपन्न झाला. प्रत्येक नृत्यातून आपली संस्कृती, आपला वारसा हा विषय प्रभावीपणे मांडण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांचे मनोबल उंचावले.
दरम्यान, पंकज मलिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आत्मविश्वास, परिश्रम आणि नेतृत्वगुणांच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आणि ध्येयवादी दृष्टिकोन आजच्या पिढीने आत्मसात करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी, उत्कृष्ट शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमसाठी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.