500 रुपयांपासून 50 हजारांपर्यंतच्या चपलांना मोठी पसंती
| कोल्हापूर | प्रतिनिधी |
राष्ट्रकुल परिषदेच्या पार्श्वभूमीवर संसद भवन परिसरात भारत ऑन द मूव्ह’ या भारतीय उत्पादनांच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला देश-विदेशातील प्रतिनिधी होते. विशेषतः महाराष्ट्राच्या पारंपरिक वारशाचे प्रतीक असलेल्या कोल्हापुरी पादत्राणांच्या शैलेश फूटवेअर या स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनाच्या दोन्ही दिवशी या स्टॉलसमोर पाहुण्यांची सतत गर्दी पाहायला मिळाली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील उद्योजक महेश पोवार यांनी या स्टॉलद्वारे कोल्हापुरी चपलांची समृद्ध परंपरा सादर केली. 500 रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत किमतीच्या विविध डिझाइनच्या चपलांना मोठी मागणी होती. विदेशी पाहुण्यांनी कोल्हापुरी चपलांची रचना, टिकाऊपणा आणि हाताने तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेतली. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसाठी मापानुसार चपला तयार करून घेण्याची इच्छा व्यक्त केली. या परिषदेदरम्यान लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह विविध राष्ट्रांतील संसदाध्यक्ष आणि सभापतींनी या स्टॉलला भेट देत पोवार यांच्याशी संवाद साधला. त्यांनी कोल्हापुरी पादत्राणांच्या इतिहासासह पारंपरिक कारागिरीबाबत माहिती दिली.
शैलेश फूटवेअर या व्यवसायाला सुमारे 70 वर्षांची कौटुंबिक परंपरा असून कोल्हापूरच्या राजघराण्यापासून अनेक नामवंत राजकीय नेते येथे पादत्राणे खरेदी करतात. औंध संस्थानाच्या हत्तीसाठी खास तयार करण्यात आलेल्या कोल्हापुरी चपलांमुळेही हा ब्रँड चर्चेत आला होता. या प्रदर्शनासाठी आणलेल्या सुमारे 500 जोड चपलांपैकी बहुतेक विकल्या गेल्याचे पोवार यांनी सांगितले. याआधी दिल्ली, आग्रा, बेंगळुरू येथेही त्यांनी यशस्वी सहभाग घेतला असून सूरजकुंड (हरियाणा) येथील प्रदर्शनासाठीही त्यांना आमंत्रण मिळाले आहे. दरम्यान, इटलीतील नामांकित प्राडा कंपनीने कोल्हापुरी चपलांपासून प्रेरणा घेत त्या जागतिक स्तरावर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राडा मेड इन इंडिया या उपक्रमासाठी निवड झालेल्या कारागिरांमध्ये महेश पोवार यांचा समावेश आहे.





